Published On : Tue, Aug 6th, 2019

धावत्या रेल्वेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे

शताब्दी एक्स्प्रेसमधील घटना, लोहमार्ग पोलिस ठाण्यात गोंधळ

नागपूर : साखर झोपेत असलेल्या एका विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्याचा धक्कादायक प्रकार आज सोमवारी सकाळी शताब्दी एक्स्प्रेसमध्ये घडला. संतापलेल्या नातेवाईकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. नंतर लोहमार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून गुन्हा नोंदविला. पुढील कारवाईसाठी त्याला आमला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मधून अनिल कासवा (२४, रा. गांधी वॉर्ड, हिंगणघाट) असे अश्लील चाळे करणाºयाचे नाव आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला दोन मुले आहेत.

हिंगणघाट येथे त्याचा कापड्याचा व्यवसाय आहे. तर पीडित विद्यार्थिनी नागपुरातील रहिवासी असून ती बीएसस्सी ला आहे. काही दिवसांपूर्वी मधूर त्याच्या कुटुंबीयांसह उज्जैन येथे दर्शनासाठी गेला होता. यावेळी कासवा कुटुंबातील जवळपास ५० लोक होते. परतीच्या प्रवासात १२९१३ शताब्दी एक्स्प्रेसने नागपुरला परत येत होते. मधूर हा बी-१ बोगीत प्रवास करीत होता. तर पीडित विद्यार्थिनीही त्याच बोगीत होती. ती एकटीच नागपुरला येत होती. ही संधी साधून मधूरची वाईट नजर तिच्यावर होती. बºयाच वेळ पर्यंत तो तिच्याकडे वाईट नजरेने बघत होता. या घानेरड्या प्रकारामुळे ती त्रासली होती, परंतु ती एकटी असल्याने त्याला काहीच बोलू शकली नाही. त्यामुळे त्याची हिंमत वाढली. ती साखर झोपेत असताना त्याने चक्क तिच्याशी अश्लील चाळे केले. हा प्रकार आमला ते दुर्ग दरम्यान सकाळी ७ ते ७.३० वाजताच्या सुमारास घडला.

पीडित तरूणीने आरडा ओरड करताच प्रवासी धावले. त्याच प्रमाणे गाडीतील सुरक्षा जवानही बोगीत पोहोचले. दरम्यान या प्रकारामुळे डब्यातील प्रवासी संतापले होते. मात्र, मधूरच्या नातेवाईकांची संख्या बरीच असल्याने प्रवासी शांत राहीले. या घटनेची माहिती लोहमार्ग नियंत्रण कक्षाला देण्यात आली. तसेच पीडितेने नातेवाईकांना सांगितले. शताब्दी एक्स्प्रेस नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक ५ वर सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोहोचणार असल्याने तिचे नातेवाईक आधीच पोहोचले. मधूरला लोहमार्ग ठाण्यात आणत असतानाच पीडितेच्या नातेवाईकांनी त्याची चांगलीच धुलाई केली. त्याच्याविरूध्द कलम ३५४ अंतर्गत गुन्हा नोंदवून हे प्रकरण आमला लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. हेड कॉन्स्टेबल श्रीकृष्ण पवार आणि पोलिस शिपाई सेलोटे यांनी मधूरला सायंकाळच्या गाडीने आमला येथे घेवून गेले. हे संपूर्ण प्रकरण हेड कॉन्स्टेबल आॅजवेल्ड थॉमस यांनी हाताळले.

टीसीची मध्यस्थी
लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही नागपूर विभागातील दोन टीसींनी या प्रकरणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात मधूर सोबत असलेल्या त्याच्या नातेवाईकांशी चर्चा केली. तसेच फिर्यादी सोबत भेटून हे प्रकरण मिटविण्यासाठी त्यांचे रात्रीपर्यंत प्रयत्न सुरू होते. विशेष म्हणजे यात एक महिला टीसीही होती. एका विद्यार्थिनीसोबत घाणेरडा प्रकार होत असताना प्रकरण मिटविण्यासाठी मध्यस्थिची भूमिका बजावने कितपत योग्य आहे, असा प्रश्न यावेळी पोलिस वर्तुळात होता.

लोहमार्ग ठाण्यासमोर गोंधळ
मधूरला लोहमार्ग ठाण्यात आणल्यानंतर ठाण्यासमोर प्रचंड गर्दी झाली. मधूरचे नातेवाईकांची संख्या जास्त होती. याच वेळी पीडितेचेही नातेवाईक अमोरा समोर आले. बºयाच वेळ पर्यंत त्यांच्यात वाद सुरू होता. प्रकरण मिटविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अखेर पोलिस निरीक्षक वासूदेव डाबरे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर सारेच शांत झाले.