सरकार शुद्धीवर का नाही, याचे कारण आता उमगले!: विखे पाटील

Advertisement

Radhakrishna Vikhe Patil

नागपूर: विधानभवनातील गटारात दारूच्या बाटल्या सापडल्याच्या घटनेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी खोचक टीका केली असून, हे सरकार मागील ४ वर्षांपासून शुद्धीवर का नाही, याचे कारण आता उमगल्याचे म्हटले आहे.

विधानभवन परिसरात तुंबलेले पाणी बाहेर काढताना गटारांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या होत्या. त्यावर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले की, विधानभवनात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडतात, हे सुरक्षा यंत्रणेचे मोठे अपयश आहे.

विधानभवनाचा खंडीत झालेला वीज पुरवठा आणि पाणी तुंबल्याच्या प्रकाराबाबत बोलताना विरोधी पक्षनेते म्हणाले की, या सरकारकडे ‘डिझास्टर मॅनेजमेंट’ नाही. उलटपक्षी त्यांचे ‘मॅनेजमेंट’च एक ‘डिझास्टर’ आहे. म्हणूनच पाऊस आणि खंडित वीज पुरवठ्यामुळे विधीमंडळाचे कामकाज बंद करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. भाजप-शिवसेना सरकारने महाराष्ट्राला अगोदरच अंधारात ढकलले आहे. आज विधीमंडळालाही अंधारात ढकलले.

राज्याला तर अगोदरच बुडवले आहे. आता विधानभवनही बुडते की काय, अशी गंभीर परिस्थिती या सरकारने निर्माण करून ठेवल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.