Published On : Sat, Jan 15th, 2022

प्रवासी मोटर वाहनांमध्ये आता 6 एअरबॅग अनिवार्य : ना. गडकरी

जीएसआर अधिसूचनेचा मसुदा मंजूर

नागपूर: प्रवासी वाहून नेणार्‍या मोटर वाहनातील प्रवाशांची सुरक्षितता वाढविण्यासाठी किमान 6 एअरबॅग अनिवार्य करण्यात येत असून त्यासाठीच्या जीएसआर अधिसूचनेचा मसूदा मी मंजूर केला आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका टि्वटद्वारे कळविले आहे.

महामार्ग वाहतूक मंत्रालयाने 1 जुलै 2019 पासून चालकासाठी एअरबॅग आणि 1 जाने 2022 पासून चालकाशेजारी बसलेल्या सहप्रवासी व्यक्तीला एअरबॅग फिटमेंटची अमलबजावणी अनिवार्य केली होती.

मोटर वाहनाच्या पुढील आणि मागील बाजूस बसलेल्या प्रवासी व्यक्तींना पुढच्या बाजूने आणि शेजारील बाजूने अपघात झााल्यास अपघाताचा प्रभाव किंवा नुकसान कमी करण्यासाठी मोटर वाहनात बसलेल्या व्यक्तीला अपघाताची इजा होऊ नये यासाठी एम-1 वाहन श्रेणीमध्ये 4 अतिरिक्त एअरबॅग अनिवार्य केल्या जातील असा निर्णयही घेण्यात आल्याचे ना. गडकरी यांनी म्हटले आहे.

प्रवासी मोटर वाहनाच्या दोन बाजूंच्या दोन एअरबॅग्ज आणि दोन्ही बाजूंचे पडदे-ट्यूब एअरबॅग्ज आतील सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहेत. देशातील मोटार वाहन अधिक सुरक्षित बनविण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वाहनाचा प्रकार व किंमत कितीही असली तरी नवीन नियमामुळे मोटार वाहनातील प्रवाशांची सुरक्षेची खात्री वाढेल, असा विश्वासही ना. गडकरी यांनी व्यक्त केला आहे.