Published On : Thu, Dec 21st, 2017

वेदप्रकाश मिश्रांना यांना नागपूर विद्यापीठाची नोटीस

नागपूर : गांधी विचारधारा स्नातकोत्तर पदविका अभ्यासक्रमात वाड्.मय चौर्यकर्म केल्याप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नोटीस बजावण्यात येणार आहे. तब्बल ३० वर्षांच्या कालावधीनंतर या प्रकरणात विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे. गुरुवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर ‘मॅरेथॉन’ चर्चा झाली. यानंतर ही नोटीस बजाविण्याचे ठरविण्यात आले.

डॉ.मिश्रा यांनी १९८७ साली गांधी विचारधारा अभ्यासक्रमात शोध प्रबंध सादर करताना गैरप्रकार केल्याचा आरोप तत्कालिन विधीसभा सदस्य रामभाऊ तुपकरी यांनी १९९१ मध्ये लावला होता. तत्कालिन कुलगुरूंनी न्यायिक चौकशीचे आदेश दिले होते. न्या.रत्नपारखी समितीने १९९२ साली काही तथ्य विद्यापीठासमोर मांडले. यानुसार डॉ.मिश्रा यांनी आपल्या ‘फिल्ड रिपोर्ट’मध्ये आर.व्ही.राव यांनी १९६९ साली लिहीलेल्या पुस्तकातील १० प्रकरणे शब्दश: ‘कॉपी’ केली होती. त्यानंतर ९ आॅक्टोबर १९९२ साली तत्कालिन व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत रत्नपारखी समितीच्या अहवालाला मान्य करण्यात आले. डॉ.मिश्रा यांनी या निर्णयाला दिवाणी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. २२ नोव्हेंबर २०१३ रोजी न्यायालयाने हा दावा खारीज केला होता. १९९२ च्या निर्णयानुसार आतापर्यंत डॉ.मिश्रा यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नव्हती.

यासंदर्भात गुरुवारी परीक्षा मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली. ‘लोकमत’ला मिळालेल्या माहितीनुसार या नोटीशीच्या माध्यमातून डॉ.मिश्रा यांच्याकडून या प्रकरणात लेखी स्पष्टीकरण मागण्यात येणार आहे. यासाठी १५ दिवसांचा वेळ देण्यात येणार आहे. १ महिन्यानंतर परत परीक्षा मंडळाची बैठक बोलविण्यात येणार असून यावेळी त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहून आपला पक्ष मांडावा लागेल. त्यानंतर परीक्षा मंडळ पुढील निर्णय घेईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. डॉ.मिश्रा यांना आपली बाजू मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे व नैसर्गिक न्यायानुसार त्यांना ही संधी देण्यात आली आहे, असे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी सांगितले.