Published On : Wed, Mar 29th, 2017

राष्ट्रपतीपद मिळालं तरी स्वीकारणार नाही! – मोहन भागवत

Advertisement


नागपूर:
राष्ट्रपतीदावरून आता राष्ट्रीय स्तरावर जोरदार चर्चा रंगली असून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सर्वेसर्वा मोहन भागवत हे राष्ट्रपती पदासाठी अगदी योग्य व्यक्त असल्याचे म्हटले होते. राष्ट्रपतीपदासाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. आता यावर मोहन भागवत यांनी स्पष्टीकरण देत ‘राष्ट्रपतीपद मिळालं तरी मी ते स्वीकारणार नाही, असं ते म्हणाले आहेत. असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आपलं नाव राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीतून काढूनच घेतलं आहे.

ते म्हणाले की, ‘मी संघात येताना राजकारणाचे सर्व दरवाजे बंद केले होते, त्यामुळे राष्ट्रपती होण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना नमूद केलं. राष्ट्रपतीपदासाठी माझ्या नावाची चर्चा केवळ माध्यमांमध्ये आहे. त्याकडे मनोरंजन म्हणून बघा आणि सोडून द्या. ही चर्चा हवेत विरेल, असं म्हणत भागवतांनी हा विषय संपवला आहे. मग आता राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत लालकृष्ण अडवाणी हेच सध्या चर्चेत आहेत.

प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ जुलै २०१७ मध्ये संपणार आहे. त्यामुळे नव्या राष्ट्रपती पदासाठी चर्चा सुरू झाली आहे. भाजप आपल्या मर्जीचा राष्ट्रपती बसवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांना बहुमतासाठी शिवसेनेची साथ हवी आहे. त्यामुळे आता या मानाच्या सिंहासनावर कोण बसणार, याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. अनेकांच्या नावांसोबत मोहन भागवत यांच्या नावाची जोरदार हवा होती. मात्र त्यांनी ते पद स्विकारणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

भारताला हिंदूराष्ट्र करायचं असेल तर मोहन भागवत हेच राष्ट्रपतीपदासाठी उत्तम पर्याय आहेत, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडल्यानं भागवतांचं पारडं अधिकच जड झालं होतं. मात्र, राष्ट्रपतीपदामध्ये रस नसल्याचं सांगून भागवतांनी आज या चर्चांवर पडदा पाडला आहे.