Published On : Sun, Apr 28th, 2024

शिंदे गटासह राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही; संजय राऊतांचा दावा

Advertisement

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. तसेच ‘शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही’, असा दावा केला आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या जाहीरनाम्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, “त्यांच्या जाहीरनाम्याचा तसाही काही उपयोग नाही. शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या जाहीरनाम्याचा काहीही फायदा होणार नाही. कारण दोन्ही गटाचा एकही खासदार निवडून येणार नाही. हे मी आज स्पष्ट करत आहे. तसेही त्यांना जाहीरनामा कळत नाही, त्यांनी आधी लिहायला आणि वाचायला शिकले पाहिजे,अशा शब्दात राऊत यांनी निशाणा साधला.

केंद्र सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रिक टन सफेद कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. यावरून राऊत यांनी मोदी सरकारला धारेवर धरले. दोन हजार मेट्रिक टन गुजरातचा कांदा मुंबईच्याच न्हावा-शिवा पोर्टस् वरून परदेशात जाणार आहे.

ऐन निवडणुकीत गुजरातच्या व्यापाऱ्यांना आणि ठेकेदारांना मालामाल करण्याचा हा डाव आहे. महाराष्ट्राचा कांदा हा सडत आहे, त्याला भाव नाही. येथे तुम्ही निर्यातबंदी केली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चार पैसे मिळणार तर लगेच बंदी केली. पण गुजरातचा पांढरा कांदा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रिय आहे,असे टोमणा राऊत यांनी मारला.