नागपूर : राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. अनेक पक्षांना खिंडार पडले. नवे मित्रपक्ष भाजपसोबत सत्तेत आले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पक्षांतर करणाऱ्या आणि संधीसाधू नेत्यांबद्दल टिप्पणी केली आहे.
काही संधीसाधू नेते मूळ विचारांशी तडजोड करून सातत्याने सत्ताधारी पक्षाबरोबर राहण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र हे लोकशाहीसाठी चांगले नाही.
सत्तेत कोणताही पक्ष असो, एक गोष्ट मात्र कायम असते, ती म्हणजे चांगलं काम करणाऱ्याला कधीच सन्मान मिळत नाही आणि वाईट काम करणाऱ्याला कधीच शिक्षा होत नाही.
नितीन गडकरी यांनी मंगळवारी (६ फेब्रुवरी) एका वृत्तसमूहाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
राजकरणात काही नेते आहेत जे मूळ विचारसरणीसह उभे आहेत. त्यांचा दृढनिश्चय सातत्याने दिसून येतो. ते त्यांच्या विचारांची प्रतारणा करत नाहीत. परंतु, या नेत्यांची संख्या खूप कमी असल्याचे गडकरी म्हणाले.
जो जातीची गोष्ट करणार, त्याला लाथ पडणार-
गडकरी यांनी जातीवादावर भाष्य करत म्हटले की, महाराष्ट्रात विविध जातींची आंदोलने होत आहेत. त्यापैकी बरीच शिष्टमंडळं मला येऊन भेटतात. मी कधीही जात- पात मानली नाही. त्यामुळे या चुकीच्या राजकारणातून समाज व देशाचा विकास शक्य नाही,असेही गडकरी म्हणाले.