Published On : Thu, Sep 12th, 2019

एनसीपीला सोडून महाराष्ट्रात कुणालाही सरकार स्थापन करता येणार नाही- पाटील

Advertisement

शिवस्वराज्य यात्रेच्या काटोल येथील जाहीर सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून महाराष्ट्रात कुणालाही सरकार स्थापन करता येणार नाही एवढी ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विधानसभेत जाणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी काटोलच्या जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद ही शरद पवार साहेबांची ताकद आहे. शरद पवारसाहेबांनी कानाकोपऱ्यात जावून लोकांचे प्रश्न सोडवण्याची किमया केलेली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

आज शरद पवारसाहेबांना सोडून जाणार्‍या लोकांबद्दल चीड, द्वेष आणि घृणा निर्माण झाली आहे. अशा लोकांचा पराभव करण्याची इच्छा व उत्कंठा त्या – त्या भागातील लोकांची आहे. आता ते निवडणूकीची वाट बघत आहेत. त्याचबरोबर शरद पवारसाहेबांच्या मागे ताकदीने उभं राहण्याची भूमिका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यात हा काटोल मतदारसंघ आहे. ज्याच्यावर शरद पवारसाहेबांनी जास्त प्रेम केलं आहे.

येत्या निवडणुकीत अनेक रंग होतील, सर्व प्रयत्न होतील परंतु डगमगू नका. शोबाजीपेक्षा माणसाच्या हदयात कोण असतं यालाच महत्व असतं. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या पाठीशी ताकदीने उभे रहा असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.

शेतकऱ्यांना सरकार पंतप्रधान योजनेतून दोन हजार रुपये जमा करत आहे परंतु तेच पैसे जमा होताच त्याचदिवशी तात्काळ काढून घेण्याचा प्रकार पाटण तालुक्यातील वनकुसवडे गावात घडला असल्याचा किस्सा जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगत सरकारच्या फसव्या योजनेची पोलखोल केली.

लोकसभा निवडणुकीपुर्वी रस्ते कामाची टेंडर काढण्यात आली. रस्त्याची कामेही सुरुही झाली परंतु त्या रस्त्यांना निधीच नसल्यामुळे खोदलेले रस्त्याचे चित्र आज राज्यभर पाहायला मिळत आहे. या सरकारकडे कामे करण्यासाठी पैसेच नाहीत असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

जेवढे पैसे आहेत तेवढ्या पैशात कामं पुर्ण करण्याची भूमिका त्यावेळी आमच्या सरकारने ठेवली होती. आम्ही फसवण्याचा प्रकार केला नाही परंतु आताचे सरकार फसवणूकच करताना दिसत असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

या देशाच्या ७० वर्षाच्या कालखंडात एवढ्या खोट्या घोषणा देवून देशातील जनतेचा उपमर्द कुठल्या सरकारने केला नसेल इतकी विचित्र अवस्था या देशाच्या अर्थकारणाचा बोजवारा उडवून नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांनी केली आहे.

आज पेट्रोल आणि डिझेलवर केंद्रसरकार ५० रुपये कर गोळा करत आहे. त्यातील २५ रुपये राज्य सरकारच्या तिजोरीत जमा होत आहेत.आमच्यावेळी पेट्रोल -डिझेलचे दर वाढले की, रस्त्यावर उतरत होतात. आता तर देशातील आणि राज्यातील जनतेची लूट हे भाजप सरकार करत आहे. दुष्काळ कर ३ रुपया वरुन ८ रुपये केला आहे. एक्साईज डयुटी तिप्पट वाढवली आहे. एवढा कर भारतातील जनतेच्या खिशातून वसूल करुनही सरकार चालवता येत नसल्याची जोरदार टीका जयंत पाटील यांनी केली.

आम्ही घरे बांधत आहोत असे नरेंद्र मोदी सर्वत्र सांगत फिरतात. माझ्या वाळवा तालुक्यात २००९-२०१४ याकाळात आमच्या सरकारने ४५०० घरे बांधली. मात्र भाजप सरकार मागील पाच वर्षांमध्ये केवळ २१०० घरेच बांधू शकली.आम्ही इतकी घरे बांधून कधीही जाहिरातबाजी केली नाही. परंतु आमच्यापेक्षा निम्मी घरे बांधूनही त्या घरांची जाहिरात ज्याला घर नाही त्याच्या दारात सतत दाखवण्याचे काम फक्त भाजपा सरकारच करु शकते अशीही टिका जयंत पाटील यांनी केली.

या जाहीर सभेत खासदार डॉ. अमोल कोल्हे, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

या सभेत माजी मंत्री अनिल देशमुख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही आपले विचार मांडले.

शिवस्वराज्य यात्रेचा आजचा तिसरा दिवस असून पहिली सभा काटोल मतदारसंघात पार पडली.

या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, सुरज चव्हाण आदींसह पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.