Published On : Fri, Feb 9th, 2018

देशाच्या अखंडतेसाठी एन.एन. व्होरा यांचे मोलाचे योगदान – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

Advertisement

नवी दिल्ली : अशांत जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जम्मू-कश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून देशाच्या अखंडतेसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे,असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आज पुणे येथील सरहद संस्थेच्या वतीने आयोजित 15 व्या ‘संत नामदेव पुरस्कार’ वितरण कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. यावेळी श्री. गडकरी आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार यांच्या हस्ते जम्मू- कश्मीरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांना संत नामदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, दैनिक पंजाब केसरीचे मुख्य संपादक विजय चोपडा, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यावेळी मंचावर उपस्थित होते. पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

श्री. गडकरी म्हणाले, अशांत जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे जिकिरीचे काम श्री.व्होरा यांनी गेल्या १० वर्षांमध्ये समर्थपणे केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच देशाच्या अखंडतेसाठी कार्यरत सरहद संस्थेने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली. संत नामदेवांनी महाराष्ट्रासोबतच देशात एकता व अखंडता निर्माण करण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे हा पुरस्कार प्रदान करणारी सरहद संस्था, ज्यांच्या नावे हा पुरस्कार देण्यात येत आहे ते संत नामदेव आणि पुरस्कार स्वीकारणारे श्री. व्होरा हा एक उत्तम योग असल्याचेही श्री .गडकरी म्हणाले.

यावेळी श्री. शरद पवार ,श्री. हंसराज अहिर आणि श्री. विजय चोपडा यांची भाषणे झाली. सरहदचे संजय नहार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.