Published On : Fri, Feb 22nd, 2019

मनपाच्या शाळा आता डिजीटल होणार

Advertisement

शिक्षण समितीच्या प्रस्तावाला पालकमंत्र्यांची मंजुरी

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या शाळा आता डिजीटल होणार आहेत. महापालिकेच्या १५० शाळांचे वर्ग आता डिजीटल पद्धतीने सुरू करण्यात येणार आहे. शिक्षण समितीतर्फे शाळा डिजीटल करण्याबाबत पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्याला पालकमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. या कामासाठी सहा कोटी रूपयांचा निधी देखील शासनाच्या वतीने देण्यात आला असल्याची माहिती शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली. शुक्रवारी (ता.२२) मनपा मुख्यालयात शिक्षण समितीची बैठक आयोजित कऱण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपसभापती भारती बुंदे, सदस्य रिता मुळे, राजेंद्र सोनकुसरे, प्रमिला मंथरानी, मनोजकुमार गावंडे, मो .इब्राहिम तौफिक अहमद, उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

सदर बैठकीत मनपा शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बूट व मोजे देण्याचा प्रस्ताव पारीत करण्यात आला. पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठरावही पारीत करण्यात आला. बनातवाला शाळेसाठी मनपाने चार कोटी रुपये खर्च करून तयार केलेल्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते लवकरच करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.

पुढे बोलताना समिती सभापती प्रा.दिवे म्हणाले, यावर्षी विद्यार्थ्यांना गणवेशासह स्वेटर पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत वाढ होण्यासाठी देखिल प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. सायकल बॅंक योजनेअंतर्गत दुरून येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला सायकलचे वितरण करण्यात येणार आहे. प्रारंभी शिक्षण समिती सभापती प्रा.दिवे यांनी शाळा निरिक्षकाकडून स्वेटर वाटप केल्याबाबत शाळानिहाय आढावा घेतला. महापालिकेच्या शाळांमध्ये इयत्ता ५ ते १० वर्गात सेमी इंग्रजी माध्यम सुरू करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली.

शासनाच्या निर्णयानुसार नागरी भागातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार देण्याबाबत विचार करण्यात यावा, त्याचप्रमाणे शासनाच्या निर्देशानुसार व अध्यादेशानुसार त्याची अंमलबजावणी व्हावी, असे निर्देश सभापती दिलीप दिवे यांनी दिले. पुढील शैक्षणिक वर्षात घड्याळी तासिका शिक्षक नियुक्त करण्याबाबत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी प्रस्ताव समितीपुढे सादर केला. त्यावर बोलताना समिती सभापती यांनी लवकरच या प्रस्तावावर विचार करण्यात येईल, असे सांगितले.