Published On : Tue, Jun 13th, 2017

महापौरांनी घेतला तयारीचा आढावा : आयोजन समितीचे गठन

yoga Day meeting
नागपूर: जागतिक योग दिनाच्या निमित्ताने शहरातील योगाभ्यासी मंडळ व विविध संस्थांच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेतर्फे २१ जून रोजी योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाची जय्यत तयारी मनपातर्फे सुरू आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. सामूहिक प्रयत्नातून योग दिनाचे आयोजन अविस्मरणीय करण्याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले.

बैठकीला महापौर आणि आयुक्तांसह ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, शिक्षण सभापती दिलीप दिवे, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त रवींद्र देवतळे, डॉ. रंजना लाडे, निगम सचिव हरिश दुबे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, डॉ. विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी योग दिन आयोजनासंदर्भातील माहिती दिली. त्या म्हणाल्या, नागपूर शहरातील विविध योगाभ्यासी मंडळाचे आयोजनात सहकार्य लाभत आहे. परंतु आयोजक म्हणून मनपाची जबाबदारी मोठी आहे. मनपातील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच आयोजनाची यशस्वीता शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपआपली जबाबदारी योग्यरीत्या आणि प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहनही यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले.

Advertisement

आयुक्त अश्विन मुदगल यांनी कार्यक्रमाच्या अगोदर आणि नंतरच्या स्वच्छतेवर भर दिला. त्यासंदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. योग दिनाच्या निमित्ताने नागपूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्रित येणार आहेत. हे निमित्त साधून मनपातर्फे सुरू असलेल्या योजनांची जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

आयोजन समितीचे गठन
जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी व्हावे यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक समन्वय समिती तयार करण्यात आली असून महापौर नंदा जिचकार यांनी समितीची घोषणा केली. समितीचे संयोजक उपमहापौर दीपराज पार्डीकर असून क्रीडा सभापती नागेश सहारे आणि शिक्षण सभापती दिलीप दिवे सहसंयोजक आहेत. इतर सदस्यांमध्ये स्थापत्य सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण सभापती वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, रूपा रॉय, उज्ज्वला शर्मा, सुनील हिरणवार, उपायुक्त रवींद्र देवतळे आणि डॉ. रंजना लाडे यांच्यासह सहभागी योग मंडळांतील प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे.

स्वच्छतेची सामूहिक शपथ
योग दिनाच्या निमित्ताने हजारो नागपूरकर यशवंत स्टेडियम येथे २१ जून रोजी एकत्रित येणार आहेत. यानिमित्ताने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने यावेळी माहिती देण्यात येईल. उपस्थित जनसमुदायाला मनपातर्फे स्वच्छतेची शपथ देण्यात येईल.

मुख्यमंत्री फडणवीस, ना. गडकरी यांची उपस्थिती
जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मनपातर्फे विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

योग मंडळांचा सहभाग
सदर आयोजनात सहजयोग ध्यान केंद्र, स्वाभिमान ट्रस्ट, रामचंद्र मिशन, क्रीडा भारती, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली, एनसीसी, भारतीय वायुसेना, आरपीटीसी, गायत्री परिवार, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, मैत्री परिवार यांच्यासह विविध संस्थांचे सहकार्य लाभत आहे.

‘व्हाईट’ ड्रेस कोड
योग दिनाच्या निमित्ताने यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात ‘व्हाईट’ ड्रेस कोड राहणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने श्वेत रंगाचे वस्त्र परिधान करावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement