
नागपूर – नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी वॉटर (NMC-OCW) यांनी ‘नागपूर जल ग्राहक सेवा’ हे मोबाईल ॲप सुरू केले आहे. हे अत्याधुनिक डिजिटल प्लॅटफॉर्म नागपूरकरांसाठी पाणीसेवा अधिक सुलभ आणि वेगवान करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना पाण्याशी संबंधित विविध सेवा घरबसल्या, एका क्लिकवर उपलब्ध होतील, त्यामुळे लांबच लांब रांगा लावणे किंवा कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.
या ॲपद्वारे ग्राहकांना तक्रारी नोंदवता येतील आणि त्यांचा निपटारा ऑनलाईन पाहता येईल. तक्रार नोंदवल्यानंतर, पूर्वीप्रमाणेच ती थेट नेटवर्क अभियंत्यांकडे पाठवली जाईल, ज्यामध्ये कोणतीही मॅन्युअल प्रक्रिया नाही. बिलिंग आणि पेमेंट्स अधिक सुलभ झाले आहेत, ग्राहकांना PDF स्वरूपात बिल पाहता येईल, पेमेंट इतिहास तपासता येईल आणि नेट बँकिंग, डेबिट/क्रेडिट कार्ड, UPI तसेच वॉलेटद्वारे सहज पेमेंट करता येईल.
पूर्वी ग्राहकांना नाव बदल, नळाचा आकार बदल आणि इतर सेवांसाठी झोन कार्यालयात जावे लागत असे, मात्र आता या सर्व सेवा एका क्लिकवर उपलब्ध आहेत.
या ॲपमधून वापरकर्त्यांना लवकरच रिअल-टाइम नोटिफिकेशन्स, बिलिंग, सेवा अद्ययावत माहिती आणि इतर सूचना पुश नोटिफिकेशन किंवा एसएमएसद्वारे वेळोवेळी मिळतील.
नागरिकांना हे ॲप डाउनलोड करून जलद, सुलभ आणि सोयीस्कर पाणीसेवांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी NMC-OCW हेल्पलाइन 1800 266 9899 वर संपर्क साधा किंवा contact@ocwindia.com वर ईमेल करा.








