Published On : Sun, Apr 5th, 2020

पोहरा नदीचे सौंदर्य खुलणार!

तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात खोलीकरण आणि रुंदीकरण

नागपूर: सोनेगाव तलावाकडून वाहत येणाऱ्या सोमलवाडा, मनीषनगर, बेसा, हुडकेश्वर असे मार्गक्रमण करीत पुढे नागनदीला मिळणाऱ्या पोहरा नदीचे सौंदर्य आता अधिक खुलणार आहे. नाला म्हणून या नदीकडे पाहणाऱ्या नागरिकांचा आता खऱ्या अर्थाने पुढील २० दिवसानंतर पोहरा नदीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. कारण मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात या नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण होत असून कार्यपूर्ततेनंतर तिला सौंदर्याचे वैभव प्राप्त होणार आहे.

नागपूर महानगरपालिका दरवर्षी लोकसहभागातून नदी स्वच्छता अभियान राबविते. याअंतर्गत शहरातील नाग नदी, पिली नदी आणि पोहरा नदीची स्वच्छता करण्यात येते. पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होऊ नये, प्रवाह चांगला होऊन वस्त्यांमध्ये पाणी शिरु नये, हा त्यामागील उद्देश असते. पावसाळ्याच्या तोंडावर होणारे दरवर्षीचे काम यंदा मात्र दोन महिने अगोदर सुरू झाले आहे.

पोहरा नदी स्वच्छता अभियानाला १ एप्रिलला सुरुवात झाली. पोहरा नदी स्वच्छतेचे काम १३.२० किलोमिटरचे असून तीन टप्प्यात त्याला विभागण्यात आले आहे. ४.२ कि.मी.चा सहकार नगर ते नरेंद्र नगर इथपर्यंत पहिला टप्पा, नरेंद्र नगर ते पिपळा फाटा हा ४.६ कि.मी.चा दुसरा टप्पा आणि पिपळा फाटा ते नरसाळा/विहीरगाव हा ४.४ कि.मी. चा तिसरा टप्पा अशी या नदीची कामाच्या दृष्टीने विभागणी करण्यात आली आहे. पोहरा नदीचे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर आहे. मागील पाच दिवसांत पोहरा नदीतून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला. हा काळ त्याच वेळी डम्परच्या साहाय्याने इतरत्र टाकण्यात आला. नदीतून काढण्यात येत असलेला गाळ वाया जाऊ न देता बाग कामासाठी, खोलगट भागातील भरण भरण्यासाठी त्याला उपयोगात आणण्यात येत आहे. नागरिकांनाही अगदी मोफत त्यांच्या बागकामासाठी हा गाळ देता येईल, अशी माहिती मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.

पोहरा नदी शहरातील गजबजलेल्या परिसरातून वाहते. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जातो. यामुळे परिसरातील घाण पाणीही या नदीत जात असल्याने पाणी दूषित झाले आहे. हेच दूषित पाणी प्रक्रिया करून मैदान, उद्यानात वापरता यावे यासाठी याच नदीवर मनीषनगर येथे एसटीपी उभारला जात आहे. रहिवासी वस्तीतून वाहणाऱ्या या नदीचे सौंदर्य वाढावे, हा नदी स्वच्छता अभियानामागील हेतू आहे. यासाठी या नदीच्या खोलीकरणासोबतच रुंदीकरणाचेही काम हाती घेण्यात आले आहे. नदीच्या दोन्ही बाजूला जमा होणारा कचरा, माती ही सुद्धा काढून नदीचे सौंदर्य खुलविले जात आहे.

लॉकडाऊन नंतर जेव्हा नागरिक घराबाहेर पडतील तेव्हा त्यांना पोहरा नदीचे रुप पालटलेले दिसेल, असा विश्वास मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला. यापुढे नागरिकांनी या नदीकडे नाला म्हणून न पाहता नदी म्हणूनच त्याचे सौंदर्य आणि पावित्र्य जपावे, असे आवाहन केले आहे.

नदी स्वच्छतेच्या या कार्यात महामेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आदींचे सहकार्य लाभत आहे. या सर्व विभागाने नदी स्वच्छतेसाठी आवश्यक मशिनरी उपलब्ध करून दिलेल्या आहेत.