Published On : Thu, Apr 4th, 2019

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नदी, नाले सफाईचे कामे सुरू करा

मनपा आयुक्तांचे निर्देश : नदी स्वच्छता तयारी आढावा बैठक

नागपूर : मागील वर्षी पहिल्या पावसात शहरातील ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले होते त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. आवश्यक त्या डागडुजी करा. मशीन आणि कर्मचारी सज्ज ठेवा. शहरातील वस्त्यांमधील नाल्यांची सफाईचे काम सुरू आहे. त्यात खंड न पडू देता युद्धपातळीवर सुरू ठेवा आणि नाग नदी, पिवळी नदी तसेच पोहरा नदी स्वच्छता अभियान मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लोकसहभागातून सुरू करा, असे निर्देश मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Gold Rate
27 Sept 2025
Gold 24 KT ₹ 1,14,100 /-
Gold 22 KT ₹ 1,06,100 /-
Silver/Kg ₹ 1,43,400/-
Platinum ₹ 49,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित पावसाळापूर्व नदी स्वच्छता आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त अझीझ शेख, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह सर्व झोनचे कार्यकारी अभियंता, सहायक आयुक्त व विभागप्रमुख उपस्थित होते.

आयुक्त अभिजीत बांगर यांनी मागील वर्षी झालेल्या पावसात शहरातील ज्या-ज्या वस्त्यांमध्ये, भागांत, परिसरात पाणी साचले होते, त्या ठिकाणची आताची परिस्थिती काय, याचा आढावा झोन सहायक आयुक्तांकडून घेतला. जी कामे अद्यापही अपूर्ण आहेत, ती तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नरेंद्र नगर येथील रेल्वे अंडर ब्रीजमध्ये पाणी साचले तर त्यासाठी मड पंप आणि पाणी फेकणाऱ्या मशीन सज्ज ठेवण्यात याव्या, ज्यांची दुकाने, घरे बेसमेंट मध्ये आहेत त्यांना तातडीने नोटीस बजावून आवश्यक त्या उपाययोजना स्वत: कराव्यात, रेल्वे विभागासोबत समन्वय साधून त्यांच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या, आयआरडीपीच्या नाल्या स्वच्छ करण्यात याव्या, नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदी स्वच्छ करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

सीएसआर फंडातून कामे करण्यासाठी पत्र
शहरातील मॉईल, वेकोलि व अशा अनेक कंपन्यांना पत्र पाठवून त्यांच्या सीएसआर फंडातून नदी, नाले स्वच्छता करण्यासाठी पत्र पाठविण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले. नाले साफ, सफाई अभियानाचे संपूर्ण समन्वयन झोन स्तरावर सहायक आयुक्तांनी करावे, असे निर्देश दिले. नदी स्वच्छता अभियानात नागपूर सुधार प्रन्यास, एमआयडीसी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग या संस्थाही सहभागी होणार असून लवकरच सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थांच्या अधिकारी, प्रतिनिधींची बैठक घेणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या मोहिमेत शहरातील स्वयंसेवी संस्थांनीही सहभागी होण्याचे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी केले.

वस्त्यांतील नाल्यांची सफाई सुरू
शहरातील अनेक भागांतून लहान-मोठे नाले वाहतात जे नाग नदी, पिवळी नदी, पोहरा नदीला मिळतात. या नाल्यांची सफाई झोन स्तरावरून सुरू करण्यात आली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तीनही मोठ्या नद्यांची स्वच्छता लोकसहभागातून करण्यात येणार असून त्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

Advertisement
Advertisement