Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Jun 7th, 2018

  सात दिवसांत नदी स्वच्छतेचे कार्य पूर्ण करा : मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह

  नागपूर: शहरातील नदी स्वच्छतेचे शिल्लक काम पुढील सात दिवसांत तर नाले सफाईचे कार्य तीन दिवसांत पूर्ण करा. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत हे कार्य असल्यामुळे कुठलीही प्रशासकीय दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. जिथे अडचण येईल तिथे सरळ माझ्याशी संपर्क साधा, असे स्पष्ट निर्देश मनपा आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले.

  नागपूर महानगरपालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन आणि पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीत ते बोलत होते. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता मनोज तालेवार उपस्थित होते.

  सर्वप्रथम आयुक्तांनी स्ट्रेचनिहाय नदी स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. नदी स्वच्छता अभियानाअंतर्गत काही स्ट्रेचचे काम तांत्रिक अडचणीमुळे लांबले असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. यावर आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. नदी स्वच्छता अभियान लोकसहभागातून असले तरी जेथे लोकसहभागातून आवश्यक मशिनरी मिळत नसेल तेथे मशिनरी किरायाने उपलब्ध करून घ्या. पावसाळा सुरू झाल्यानंतर सर्वच कामे बाधीत होतील. त्यामुळे या कामात मुळीच दिरंगाई नको. नदी स्वच्छतेचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करा, असे निर्देश त्यांनी दिले.

  यानंतर आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी नाले आणि पावसाळी नाल्यासफाईंचा झोननिहाय आढावा घेतला. लक्ष्मीनगर झोनमध्ये २२ नाले असून त्यापैकी २१ स्वच्छ करण्यात आले आहेत. धरमपेठ झोनमध्ये ३५ पैकी ३१, हनुमाननगर झोनमध्ये १४ पैकी १२, धंतोली झोनमध्ये १८ पैकी १७, नेहरूनगर झोनमध्ळे १५ पैकी १३, गांधीबाग झोनमध्ये ५१ पैकी ५१, सतरंजीपुरा झोनमध्ये २२ पैकी २१, लकडगंज झोनमधील १२ पैकी ८, आसीनगर झोनमधील १८ पैकी १८ तर मंगळवारी झोनमधील २९ पैकी २७ नाले आतापर्यंत पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली असल्याची माहिती झोन सहायक आयुक्तांनी दिली. बैठकीला सहायक आयुक्त महेश धामेचा, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, डी.डी. जांभुळकर, सतीश नेरळ, अनिरुद्ध चौगंजकर, गिरीश वासनिक, राजेश भूतकर, नगर रचना सहायक संचालक प्रमोद गावंडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक आयुक्त अशोक पाटील, विजय हुमणे, राजू भिवगडे, प्रकाश वऱ्हाडे, हरिश राऊत, गणेश राठोड, राजेश कराडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.

  झाडांच्या धोकादायक फांद्या त्वरित कापा!

  नागपूर शहरात वादळी पाऊस आल्याने अनेक ठिकाणच्या झाडांच्या फांद्या तुटून खाली पडतात. यामुळे वाहनांचे नुकसान होते. मनुष्याच्या जीवालाही धोका होऊ शकतो. अशा धोकादायक फांद्या तातडीने कापा, असे निर्देश आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिले. उद्यान विभागाने अशा धोकादायक झाडांचे सर्वेक्षण केले असून सुमारे ७० धोकादायक झाडे आढळली. फांद्या कापण्याआधी आणि फांद्या कापल्यानंतरचे छायाचित्र घ्या आणि त्याचा ठिकाणांसह संपूर्ण रेकॉर्ड ठेवा, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.

  २४ तास ३६५ दिवस सज्ज राहा!

  आपत्ती व्यवस्थापन ही आपली जबाबदारी आहे. प्रत्येक अधिकाऱ्याला आपली जबाबदारी निभावण्याचे अगदी मनापासून वाटले पाहिजे. अधिकाऱ्यांना ‘रिॲक्टिव्ह’ न होता ‘प्रो-ॲक्टिव्ह’ व्हावे, असा सल्ला आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी दिला. आपण अधिकारी आहोत. या शहरातील नागरिकांच्या सेवेसाठी आहोत. त्यामुळे आपण २४ तास आणि ३६५ दिवस आपले कर्तव्य निभावले पाहिजे, असेही ते म्हणाले.

  नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन

  आपत्ती व्यवस्थापनात नागपूर महानगरपालिकेसोबतच नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची असते. कुण्या व्यक्तीला कुठेही धोकादायक झाडे आढळून आल्यास त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला याबाबत तातडीने माहिती देण्याचे आवाहन आयुक्त वीरेंद्र सिंह यांनी केले.

  मनपाचा आपातकालीन नियंत्रण कक्ष

  आपातकालिन स्थितीची माहिती देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा आपातकालिन नियंत्रणकक्ष कार्यान्वित आहे. यासाठी १०१ हा टोल फ्री क्रमांक आहे. याशिवाय ७०३०९७२२०० हा मोबाईल क्रमांक आहे. ह्या दोन मुख्य क्रमांकासोबतच ०७१२-२५६७७७७, ०७१२-२५६७०२९, ०७१२-२०३११०१, ०७१२-२५५१८६६ ह्या क्रमांकावरही नागरिकांना संपर्क साधता येईल. याव्यतिरिक्त झोननिहाय क्रमांकही जाहीर करण्यात आले आहेत. ते पुढीलप्रमाणे आहेत. लक्ष्मीनगर झोन-०७१२-०२२४५८३३, धरमपेठ झोन-०७१२-२५६५५८९, हनुमाननगर झोन-०७१२-२७५५५८९, धंतोली झोन-०७१२-२४६५५९९,२४३२३४४, नेहरूनगर झोन – ०७१२-२७०५५८९, गांधीबाग झोन-०७१२-२७३५५९९, सतरंजीपुरा झोन-०७१२-२७६७३३९, ७०३०५७७६५०, लकडगंज झोन-०७१२-२७३७५९९, आशीनगर झोन-०७१२-२६५५६०३, २६५५६०५, मंगळवारी झोन-०७१२-२५९५५९९.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145