Published On : Tue, Aug 7th, 2018

‘आयसोलेशन’ च्या जागी अद्ययावत रुग्णालय उभारा!

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आयसोलेशन हॉस्पीटलची इमारत जीर्ण झाली आहे. वारंवार येथे दुरूस्ती केली जाते. मात्र पायापासूनच इमारत धोक्यात आली असल्याने ही इमारत पाडून केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत येथे नवीन अद्ययावत इमारत उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करा, असे निर्देश मनपाचे वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.

मंगळवारी (ता.७) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती उपसभापती विजय चुटेले, सदस्य लखन येरवार, विशाखा बांते, वंदना चांदेकर, उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, डॉ. अनिल चिव्हाणे, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, कारखाना विभागाचे योगेश लुंगे, कनक रिसोर्सचे कमलेश शर्मा यांच्यासह दहाही झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी सभापती मनोज चापले म्हणाले, मनपाच्या आयसोलेशन हॉस्पीटलची इमारत शहरातील सर्वात जुन्या इमारतींपैकी आहे. मात्र, सध्या या इमारतीची अवस्था गंभीर आहे. हॉस्पीटल इमारतीच्या दुरुस्तीसाठी कंत्राट काढले जाते. मात्र, त्यातूनही इमारतीची अवस्था पूर्णत: सुधारली जात नाही. शहरातील वाढती लोकसंख्या व रुग्णालयाची गरज लक्षात घेता येथे अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण नवे रुग्णालय व्हावे. त्यासाठी प्रस्ताव तयार करुन सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले. याशिवाय शहरात ५० नवीन रुग्णालये उभारता येतील एवढा निधी मनपाकडे आहे. मात्र, जागेअभावी ते उभारणे शक्य होत नाही. यासाठी शहरातील मनपाच्या अतिरिक्त जागेचा शोध घेऊन त्यासंबंधी माहिती सादर करावी, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले.

आता दर १५ दिवसाला होणार डास प्रतिबंधक फवारणी
सध्या शहरात डासांचा प्रकोप वाढला असून त्यामुळे डेंग्यू व इतर आजारांचा धोका वाढत आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडे आतापर्यंत अवघ्या दोनच डास प्रतिबंधक फवारणी मशीन असल्याने वेळेवर फवारणी होत नव्हती. मात्र आता एकूण पाच फवारणी मशीन उपलब्ध झाल्याने दर १५ दिवसांनी शहरात सर्वत्र फवारणी केली जाईल, अशी माहितीही श्री. चापले यांनी यावेळी दिली. साठलेल्या पाण्यात डासांची पैदास वाढत असल्याने विविध ठिकाणी पथकाद्वारे चौकशी करण्यात यावी. बांधकाम स्थळातील खड्ड्यांमध्ये जमा होणाऱ्या पाण्याबाबत निष्काळजीपणा बाळगला जातो.

यावर नियंत्रण म्हणून बांधकाम ठिकाणी औषध फवारणी करण्यात यावी व या ठिकाणी स्वच्छता राहील याकडे लक्ष द्यावे. यासंबंधी निष्काळजीपणा केल्यास बांधकाम मालकांवर कारवाई करण्यात यावी, असेही निर्देश मनोज चापले यांनी दिले. संसर्गजन्य रोगांबाबत जनजागृतीसाठी शालेय स्तरावर विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. येत्या ऑगस्ट महिन्यापासून प्रत्येक झोनमधील मनपा शाळांमधून जनजागृती अभियान राबविण्यात येईल, असेही त्यांनी सांगतिले.

कृत्रिम टँकसाठी नगरसेवकांकडून सूचना मागवा
येत्या १३ सप्टेंबरला गणेशोत्सव आहे. त्यासंबंधी संपूर्ण तयारी लवकरात लवकर पूर्ण करावी. विसर्जन स्थळी आवश्यक कृत्रिम टँकची संख्या लक्षात घेऊन त्या वाढविण्यासंबंधी प्रत्येक प्रभागानुसार नगरसेवकांकडून सूचना मागविण्यात याव्यात.

याशिवाय विसर्जित गणेश मूर्ती हटविण्यासाठी प्रत्येक झोननुसार प्रत्येकी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.