Published On : Wed, Aug 23rd, 2017

गणेशोत्सवासाठी मनपा प्रशासन सज्ज

Mpl Comm Meeting Photos 22 Aug (2)
नागपूर: गणेशोत्सवासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी गणेश विसर्जनासंबधीचा झोननिहाय आढावा मंगळवारी (ता.२२) रोजी मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात घेतला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आर.झेड.सिद्धीकी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (जलकर्म) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, स्थावर अधिकारी आर.एस. भुते, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर, कार्यकारी अभियंता के.एल. सोनकुसरे, व मनपाचे सर्व झोन सहायक आयुक्त उपस्थित होते.

प्रारंभी आयुक्तांनी झोन सहायक आयुक्तांमार्फत सर्व झोनचा कृत्रिम तलावासंबंधीचा आढावा घेतला. गणेश विसर्जनस्थळाजवळील व मार्गातील खड्डे गणेश विसर्जनापूर्वी बुजविण्यात यावे, असे निर्देश दिले. वर्दळीच्य़ा ठिकाणी गणेशोत्सवातील महत्त्वाचे ठिकाण तसेच रस्त्यांतील खड्डे हे त्वरित बुजविण्यात यावे, असे आदेश झोन सहायक आयुक्तांना दिले. कृत्रिम तलावांची संख्या व लागणाऱ्या टँकरची संख्या ही जलप्रदाय विभागाला कळविण्यात यावी. कृत्रिम तलावांची संख्या जर वाढवायची असेल तर त्यासाठी आवश्यक जागा शोधा व तेथे खड्डा करून कृत्रिम तलाव तयार करावा, असे आदेश झोन सहायक आयुक्तांना दिले. विसर्जन मार्गात एकही खड्डा राहणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी.

सर्व मार्गातील खड्डे बुजले की नाही याची मुख्य अभियंता विजय बनगिरवार यांनी पाहणी करावी, असे आदेश दिले. मुख्य मार्ग (गणपती रोड, चितार ओळ, सी.ए.रोड ) यासारख्या मार्गातील खड्डेसुद्धा तातडीने बुजविण्यात यावे. विसर्जनस्थळी सूचना फलक लावण्यात यावे. याव्यतिरिक्त मोबाईल व्हॅन प्रत्येक झोनमार्फत कार्यान्वित करण्यात यावी, असे निर्देशही आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. सर्व नागरिकांना सोयीचे होईल अश्याच ठिकाणी खड्डा खणून विसर्जन तलाव तयार करण्यात यावा. तलावाला संरक्षक कडे बांधावे, असे आदेशदेखील आयुक्त मुदगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.