नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाने नागपुरात एक प्रीमियम इंटरनॅशनल शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही शाळा पूर्णतः खासगी असेल आणि कोणतीही सरकारी मदत न घेता उभारली जाणार आहे. या शाळेसाठी टाटा टोपे सोसायटीसह एकूण चार सोसायट्यांमधून मिळून सुमारे १३ कोटी रुपये मोजून जमीन खरेदी करण्यात आली आहे, जी रेडी रेकनरनुसार २६ कोटी रुपये किमतीची आहे.
गडकरींनी सांगितले की, ही शाळा त्यांच्या आईच्या स्मरणार्थ सुरू केली जाणार असून, ही कल्पना त्यांच्या सूनबाईंनी मांडली होती. त्यांनी पुढे सांगितले की, शाळा उभारताना देशभरातील आणि मुंबईतील नामांकित शाळांचा सखोल अभ्यास करण्यात आला असून, ही शाळा शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या निकषांवर आधारित असेल. विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण, तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास यावर भर दिला जाईल.
गडकरी म्हणाले, “आमच्या कुटुंबाचे शिक्षण क्षेत्राशी काही देणेघेणे नव्हते. मात्र माझ्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि सूनबाईंच्या आग्रहावरून हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला. आम्ही कोणाकडूनही पैसे उधार घेणार नाही, स्वतःचीच व्यवस्था करून ही शाळा उभारणार आहोत. ओबेरॉयसह मुंबईतील पाच नामांकित शाळांचे निरीक्षण आमच्या कुटुंबाने केले आहे. मी अंबानी कुटुंबाशीही यासंदर्भात संवाद साधला आहे.
सरकारच्या पाया पाय देऊ नका-
कार्यक्रमात गडकरींनी उद्योगजगतातील लोकांना सल्ला दिला की, “कोणत्याही कामासाठी सरकारच्या पाया पाय देऊ नका. एकदा पाय दिलात की, संयुक्त सचिवांचा परिपत्रक येतो. यासाठीच मी संघटनांना आणि उद्योजकांना सांगतो की, स्वतःहून काम करा. सरकारी योजनांचा लाभ घ्या, पण त्यांच्यावर अवलंबून राहू नका. काम पूर्ण झाल्यावर एकदाच हात मिळवा, मार्गदर्शन घ्या आणि आपला मार्ग ठरवा. हेच यशाचे सूत्र आहे.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील संशोधनावर भर देण्याचे आवाहन-
भारतीय तांत्रिक संशोधन आणि विकास परिषद (ICTRD) यांना संबोधित करताना गडकरी म्हणाले की, “फक्त शहरी स्टार्टअप्स व उद्योगांवरच लक्ष केंद्रित न करता, ग्रामीण आणि आदिवासी भागातील जल, जंगल आणि जमीन यासंबंधीही अधिक संशोधन करण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रातही नावीन्यपूर्ण उपक्रम आवश्यक आहेत.
या संपूर्ण उपक्रमामुळे नागपूरात शैक्षणिक पातळीवर एक नविन अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे. गडकरींच्या या उपक्रमाचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात स्वागत होण्याची चिन्हे आहेत.