Published On : Fri, Jan 12th, 2018

नौदलाच्या अवमानाबद्दल नितीन गडकरी यांनी माफी मागावी : सचिन सावंत

Sachin Sawant
मुंबई: मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन देणार नाही. त्यांनी पाकिस्तान आणि चीनच्या सीमेवर जावे, त्यांचे मुंबईत काय काम? असे उद्दाम वक्तव्य करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय नौदलाचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात जाहीर निषेध करित असून त्यांनी नौदलाची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

मुंबईत नौदल अधिकाऱ्यांना एक इंचही जमिन न देण्याची भाषा ही सत्तेच्या उन्मादातून येते. सत्तेची नशा भाजपच्या नेत्यांच्या डोक्यात गेली आहे त्यामुळेच त्यांच्याकडून वारंवार अशी वक्तव्ये केली जात आहेत. मुंबईच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकणा-या तरंगत्या हॉटेलसाठी नितीन गडकरी एवढे आग्रही का आहेत? गडकरींना या तरंगत्या हॉटेलात एवढा रस का आहे? याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करून भाजपाचा राष्ट्रवाद हा भोंगळ असून तो खाजगी व्यापाऱ्यांकरीता लागू होत नाही असा टोला सावंत यांनी लगावला. काँग्रेस पक्षाला आणि भारताच्या सर्व नागरिकांना भारतीय नौदलाचा अभिमान आहे असेही सावंत म्हणाले.

२६/११च्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर मुंबईच्या सुरक्षेसाठी अधिक काळजी घेतली पाहिजे. या अगोदरही मुंबईच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दक्षिण मुंबईतील हेलीपॅडसारख्या व पुनर्निमाण प्रकल्पांना भारतीय नौदलाने आक्षेप घेतला होता. मुंबई देशाची आर्थिक राजधानी असल्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. हे समुद्रमार्गे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्पष्ट झालेले आहे. मुंबईच्या सुरक्षेसाठी मुंबईत नौदल असणे आवश्यक आहे. नौदलाला मुंबईबाहेर काढून, उद्दाम भाषा वापरून, नौदल अधिका-यांचे मानसिक खच्चीकरण करुन केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या नितीन गडकरींना पाकिस्तानला मदत करायची आहे का? असा संतप्त सवाल सावंत यांनी केला.