नाना पटोलेंनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही : नितीन गडकरी

Advertisement

नागपुर: नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत,” अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते नागपुरात एका न्यूस चॅनेल सोबत बोलत होते. तसंच “नागपूरमध्ये पाच वर्षात जे काम केलं, त्याच्या आधारावर लोकांसमोर जाऊन मत मागेन,” असंही गडकरी यांनी सांगितलं.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने काल (13 मार्च) दुसरी यादी जाहीर केली. 21 उमेदवारांच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. त्यात नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी लढत रंगणार आहे.

याविषयी विचारलं नितीन गडकरी म्हणाले की, “सगळ्यांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेसला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावं. मी जे पाच वर्षात काम केलं, त्याच्याच आधारावर लोकांसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागेन. नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही. मी राजकारणात अशाप्रकारची दुश्मनी ठेवली नाही, ठेवतही नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत.”

भाजपवर नाराज होऊन नाना पटोले यांनी गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघाचा 12 डिसेंबर 2017 रोजी राजीनामा दिला होता. तर 14 डिसेंबर 2017 रोजी त्यांचा राजीनामा मंजूर झाला होता. यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आता काँग्रेसने त्यांना नागपूरमधून गडकरींविरोधातच उमेदवारी दिली आहे.
दरम्यान, भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मधुकर कुकडे यांचा विजय झाला होता.