Published On : Mon, May 21st, 2018

अहंकार आणि मग्रूरीमुळेच नानाचा राजकारणाचा अंत : नितीन गडकरी

Nitin Gadkari at Sadak Arjuni Sabha
नागपूर/सडक अर्जुनी: अहंकार व मंग्रूरीमुळेच नाना पटोले यांच्या राजकारणाचा अंत होणार असून प्रफुल पटेल यांना पराजित करण्यासाठी भाजपात आलेले पटोले आता पटेलांचा झेंडा घेऊन लोकांकडे जात आहेत, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी सुमारे दहा हजारावर नागरिकांच्या उपस्थितीत जाहीरसभेत केली.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे भाजपा उमेदवार हेमंत (तानूभाऊ) पटले यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीरसभेत ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आ. संजय पुराम, माजी आ. केशवराव मानकर, नगराध्यक्ष सोनाली देशपांडे, डॉ. बोपचे, भावना कदम, अरविंद शिवणकर, रविकांत बोपचे, शैलजा सोनारे, विकास तोतडे, भजनदास वैद्य, खोमेश रहांगडाले, विनोद अग्रवाल, उमाकांत ढेगे, अविनाश ठाकरे, शीलाताई चव्हाण व अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्यामुळेच भंडारा गोंदियात भाजप टिकून आहे, असा नाना पटोलेचा समज होता. पण ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. कुणाच्या मालकीची नाही. कार्यकर्तेच या पक्षाचे मालक आहेत, असे सांगून गडकरी म्हणाले- प्रतिकूल परिस्थितीत कार्यकर्त्यांनी अपमान, पराभव सहन केला. श्यामबापू कापगते, लक्ष्मणराव मानकर, यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत या भागात पक्ष वाढवला. जनसंघाच्या काळात दिवा तेवत ठेवला. त्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभी झालेली पार्टी आहे. विचारधारेवर चालणारी ही पार्टी असल्याचेही गडकरी म्हणाले.

भय, भूक, आतंक आणि बेरोजगारी या देशाच्या समस्या आहे. या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत. 60 वर्षे काँग्रेसने या देशावर राज्य केले. पण या समस्या कायम ठेवल्या. स्वत:चा मात्र काँग्रेसनेत्यांनी विकास करून घेतल्याची टीका करताना गडकरी म्हणाले- राहुल गांधी पंतप्रधान मोदींनी हिशेब विचारतात. पण आम्ही फक्त 4 वर्षापासून आहोत. 60 वर्षे या देशावर ज्यांनी राज्य केले, त्यांनी आधी हिशेब द्यावा असे सांगताना गडकरी म्हणाले- शेतीत परिवर्तन झाले तर देशात परिवर्तन होणार आहे. शेतकर्‍याचा विकास करण्यास मोदी सरकारचे प्राधान्य आहे. तसेच भंडारा गोंदिया याभागातील रस्ते आणि पुलाच्या कामांसाठी 8 हजार कोटी रुपये आपण दिले असून येत्या 3 महिन्यात 90 टक्के कामे सुरु होतील, अशी माहितीही गडकरी यांनी यावेळी दिली.

Nitin Gadkari Jahhir Sabha at Sadak Arjuni
सामाजिक न्याय मंत्री राजकुुमार बडोले यांनी विकासाची नवीन पहाट राज्य आणि केंद्र शासनामुळे या राज्यात सुरु झाली आहे. शेतकर्‍यांचा विकास व सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन हेच आमचे ध्येय असल्याचेही बडोले म्हणाले. पंचायत समितीजवळील मोकळ्या मैदानात झालेल्या या सभेला दहा हजाराच्या आसपास नागरिकांनी गर्दी केली होती.

10 हजार शिवसैनिक भाजपात
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व भंडाराचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते रमेश कुथे व राजेश कुथे यांच्या नेतृत्वात दहा हजार शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश घेऊन भाजपा उमेदवार हेमंत पटले यांचा प्रचार करण्याची घोषणा केली. गडकरी यांनी या सर्वांचे भाजपात स्वागत केले. केवळ हिंदुत्व या एकाच मुद्यावर आपण भाजपात प्रवेश घेतला. या प्रवेशामुळे या परिसरातील वातावरण बदलले होते.

Nitin Gadkari Jahhir Sabha at Sadak Arjuni

Nitin Gadkari Jahhir Sabha at Sadak Arjuni