Published On : Wed, Mar 22nd, 2017

कोकणात कॉंग्रेसला धक्का; वाचा निलेश राणे यांचे राजीनामा पत्र

Advertisement

मुंबई: माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा दिल्याने रत्नागिरीत कॉंग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. दीड वर्षे उलटून गेली तरी, नेतृत्वाने जिल्ह्यात जिल्हाध्यक्षच नेमला नाही. त्यामुळे पक्षाची मोठी हानी होत असून, अशी कार्यपद्धती राहील्यास भविष्यात पक्षाची अवस्था अधिकच दयनीय होईल, असे भविष्यही राणे यांनी वर्तवले आहे. दरम्यान, आपण पदाचा राजीनामा दिला असला तरी, पक्षात कार्यरत राहील असेही राणे यांनी म्हटले आहे.

सविस्तर वाचा निलेश राणे यांचे राजीनामा पत्र.

प्रति,
मा. श्री. अशोकराव चव्हाण
प्रदेशाध्यक्ष
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी

टिळक भवन, दादर, मुंबई ४०००२५

विषय : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सरचिटणीस पदाच्या राजीनाम्याबाबत…

महोदय,
आपल्याबरोबर मागील दीड वर्षापासून रत्नागिरी जिल्ह्याला अध्यक्ष देण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर प्रत्यक्षरित्या भेटत होतो, पत्रव्यवहार करत होतो, निवेदन देत होतो. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे काही पक्षाला नुकसान झाले, पराभव बघावा लागला त्याचे प्रमुख कारण जिल्ह्याला जिल्हाध्यक्ष नाही हेच होते. प्रचाराच्या दरम्यान जेव्हा आम्ही फिरत होतो तेव्हा सातत्याने लोक, स्थानिक मतदार आम्हाला विचारत होते. ज्या पक्षाकडे जिल्हाध्यक्ष नाही, गेली दीड वर्ष तुम्हाला प्रदेश पातळीवरुन जिल्हाध्यक्ष देत नाही अशा पक्षाला आम्ही मतदान का करावे? त्याचबरोबर पंतप्रधान मोदींची लाट, भारतीय जनता पार्टी-शिवसेनेत असलेले नियोजन आणि सरकारी यंत्रणा या सगळ्याच जमेच्या बाजू त्यांच्यासोबत असल्याने आपल्या पक्षाला फार मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज पक्षाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. आम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही सर्वांना एकत्रित करुन काँग्रेस पक्ष टिकवायचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. पण असे असले तरी संघटनात्मक पातळीवर जिल्हाध्यक्ष पद हे अतिशय महत्त्वाचे पद मानले जाते. ग्रामीण भागात जिल्हाध्यक्ष पदाला मोठा मान असतो. आपणास हे सर्व माहीत असून सुद्धा या विषयावर आपण लक्ष घातलेले नाही. लक्ष बोलण्यापेक्षा तुम्ही हा विषय गांभीर्याने हाताळला नाही आणि म्हणून सरचिटणीस या नात्याने तुमच्यासोबत काम करणं हे मला शक्य नाही व ते मला जमणार नाही, कारण एका जिल्ह्याला तुम्ही जिल्हाध्यक्ष देऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये जे काही चित्र दिसलं ते स्वाभाविकच आहे असे वाटते आणि यापुढे तुमच्या नेतृत्वाखाली जर असाच कारभार चालत राहणार अ सेल तर त्याचा वाटेकरी मला व्हायचं नाही. लोकसेवेसाठी व लोकहितासाठी आम्ही समाजसेवेमध्ये आलो आहोत. कुठल्याही पदासाठी नाही किंवा पक्षाकडून काहीही मिळावे यासाठी नाही. पक्षाकडे आम्ही कधी काही मागितले सुद्धा नाही. असे असून जर तुम्ही निर्णय देत नसाल आणि तुमच्या पदाचा वापर हा फक्त तुमच्यासाठीच जर करत असाल तर भविष्यामध्ये अजून दयनीय परिस्थिती काँग्रेस पक्षाची होईल. तुम्ही सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला जर बळ देऊ शकत नाही तर अशा प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये राहणे मला शक्य होणार नाही. पण त्याहून पुढे सांगतो की त्या पदाचा अपमान होईल. दयनीय अवस्था पक्षाची होईल याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. नुसता प्रभारी देऊन जिल्ह्याचा कारभार प्रभाºयाला समजत नसतो व जिल्ह्याची संघटना बदलत नसते किंवा वाढत नसते याची जाणीव तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्याकडे बघून झाली पाहिजे. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची पद्धत ही सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला बळ देणाी असली पाहिजे. अध्यक्षाचं काम हे पक्षाला उभं करण्याचं असतं, बळ देण्याचं असतं. पण दोन वर्ष झाली, रत्नागिरी जिलल्ह्यात जे काही चित्र मी बघत आहे. कारण लोकसभा मी त्या मतदारसंघातून लढवतो. या जिल्ह्यातील पाच तालुके माझ्या लोकसभेच्या मतदारसंघात येतात. असे असून सुद्धा आम्हाला तिथे निवडणूक लढवायची आहे हे सांगून सुद्धा तुम्ही योग्य पद भरत नसाल तर त्याच्यामध्ये एक वेगळा राजकीय वास निर्माण होत आहे असे मला वाटते. आपण जर योग्य भूमिका घ्याल तर चांगली लोक पक्षात येतील. चांगली लोक पक्षात काम करतील. मात्र असाच कारभार राहिला तर उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीलाही लोक तिकीट मागायला समोर येणार नाहीत. असे दिवस काँग्रेसला दिसू नयेत म्हणून आपपल्याला सांगतो की अगोदरच फार उशीर झालाय तर अजून किती नुकसान तुम्ही रत्नागिरी जिल्ह्याचं करणार आहात हेच आम्हाला आता बघायचंय. तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस पदाचा राजीनामा मी देत आहे. परंतु यापुढेही काँग्रेस पक्षाचं काम करतच राहाणार.