नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत नवविवाहित महिलेने गळफास घेऊ आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्न होऊन केवळ वीस दिवस झाले असताना, २४ वर्षीय विवाहितेने बेडरूममध्ये गळफास घेत आत्महत्या केली. अस्मिता निखीलकुमार भुतागे (२४, रा. प्लॉट नं. २७, श्रीनगर, नंदनवन) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. ही धक्कादायक घटना शनिवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
माहितीनुसार, अस्मिता यांचे ११ फेब्रुवारी २०२४ रोजी लग्न झाले होते.
रमाईनगर टेकानाका येथील रहिवासी असलेल्या अस्मिताच्या आईने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अस्मिताचे लग्नही तिच्या पसंतीने करण्यात आले होते. सर्व काही सुरळीत सुरु असताना अस्मिताने आत्महत्येचे पाऊल का उचलले याबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
अस्मिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना खाली उतरवून उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले. यादरम्यान डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी नंदनवन ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप आडे यांनी अकस्मात मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.