Published On : Mon, Feb 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर महानगरपालिकेत नवे पर्व; महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीलाताई हाथीबेड यांनी स्वीकारला पदभार !

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या नूतन महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लीलाताई हाथीबेड आणि सत्ताधारी पक्षनेते नरेंद्र (बाल्य) बोरकर यांनी सोमवारी मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या भव्य समारंभात अधिकृतपणे पदभार स्वीकारला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे महसूल मंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या पदभार स्वीकार सोहळ्यास आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, भाजप नागपूर शहराध्यक्ष व माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी खासदार अजय संचेती, राज्य सफाई कर्मचारी कल्याण मंडळाचे अध्यक्ष सतीश डागोर, माजी आमदार अनिल सोले, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच अतिरिक्त आयुक्त वंदना पंत व वैष्णवी बी., भाजप नेते संजय भेंडे, बंटी कुकडे, जयप्रकाश गुप्ता, राजेश बागडी, विकी कुकरेजा, माजी महापौर अर्चना देणकर, मायाताई इव्हानाते, माजी स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, नव-निर्वाचित नगरसेवक, पदाधिकारी व पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नव-निर्वाचित नगरसेवकांनी मतदारांप्रती निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर वेगाने प्रगती करत असून, २०४७ पर्यंत ‘विकसित नागपूर’ घडविण्याचा निर्धार सर्वांनी करावा, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

महापौर नीता ठाकरे यांनी आपल्या भाषणात महापौर पद ही मोठी जबाबदारी असल्याचे सांगत नागरिकांनी दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूरच्या विकासाला नवी दिशा देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सत्ताधारी पक्षनेते नरेंद्र (बाल्य) बोरकर यांनी निवडून आलेले प्रतिनिधी व महापालिका प्रशासन यांच्या समन्वयातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी गतीने काम केले जाईल, असे नमूद केले.

यापूर्वी अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी महापौर नीता ठाकरे यांचे, तर अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. यांनी उपमहापौर लीलाताई हाथीबेड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपआयुक्त निर्भय जैन यांनी सत्ताधारी पक्षनेते नरेंद्र बोरकर यांचे स्वागत केले. आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते व माजी खासदार अजय संचेती यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले, तर आभार प्रदर्शन नगरसेवक श्रीकांत आगलावे यांनी केले. त्यानंतर महापौर, उपमहापौर व सत्ताधारी पक्षनेत्यांनी आपल्या दालनात औपचारिकरित्या पदभार स्वीकारला.

पदभार स्वीकारल्यानंतर महापालिका मुख्यालय परिसरात समर्थक व पक्ष कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, ढोल-ताशांच्या गजरात व पुष्पवृष्टी करून नव-नियुक्त पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत केले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.