Published On : Wed, Dec 22nd, 2021

फार्मसी शिक्षणक्रमात होत आहेत नवीन सुधारणा – डॉ. पी. जी. येवले

Advertisement

नागपूर: काळानुसार नवीन सुधारणा आवश्यक असल्यामुळे भारतीय औषधोपचार परिषदेच्या (फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया) सहकार्याने फार्मसी शिक्षणात सुधारणा प्रक्रिया करण्यात येत असल्याचे मत भारतीय औषधोपचार परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. पी. जी. येवले यांनी केले.

सेंट्रल कौन्सिल, पीसीआयद्वारे बेसा, नागपूर येथील दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित एका संवाद सत्रात ते बोलत होते. फार्मसी महाविद्यालयांना भेडसावणाऱ्या तांत्रिक अडचणींशी संबंधित विविध पैलूंवर डॉ. पी. जी. येवले यांच्याशी झालेल्या संवादात विदर्भातील फार्मसी महाविद्यालयांच्या १५० हून अधिक प्राचार्य आणि प्राध्यापकांनी हजेरी लावली आणि सक्रिय सहभाग नोंदविला.

अभ्यासक्रमातील बदल, प्रवेश, महाविद्यालयांची मान्यता यासह अनेक मुद्द्यांवर चर्चेदरम्यान प्रकाश टाकण्यात आला. डॉ. येवले यांनी संबंधित विषयांवर प्राचार्य आणि प्राध्यापकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे देखील दिली. यावेळी विदर्भातील फार्मसी शिक्षण संस्थांच्या सर्व प्राचार्य आणि प्राध्यापकांनी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष (कार्यकारी) झाल्याबद्दल डॉ. येवले यांचा सत्कार देखील करण्यात आला.

या कार्यक्रमास डॉ.अशोक सावजी, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषदेचे सल्लागार डॉ.राजेंद्र काकडे, डॉ. अरुण पाटील, अंबे दुर्गा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज बालपांडे, डॉ. प्रफुल्ल साबळे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर दादासाहेब बालपांडे फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ उज्वला महाजन यांनी आभारप्रदर्शन केले.