टँकर वाढविण्याची आणि टुल्लु पंपवर कारवाईची मागणी
नागपूर: उपलब्ध साठ्यात नागपूर शहराला मुबलक पाणी पुरवठा व्हावा, जनतेला पाण्यासाठी त्रास होऊ नये यासाठी पुढील महिनाभरासाठी पाण्याचे नियोजन करण्याच्या दृष्टीने मनपाच्या नेहरूनगर झोनमध्ये पदाधिकारी आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये पदाधिकारी आणि नगरसेवकांनी टुल्लू पंप वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत ज्या भागात पाणी पुरवठा कमी होतो त्या भागात टँकरची संख्या वाढविण्याची मागणी केली.
बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, नेहरूनगर झोन सभापती रीता मुळे, जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, माजी महापौर प्रवीण दटके, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, दुर्बल घटक समितीचे सभापती हरिश दिकोंडवार, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेविका मनिषा कोठे, स्नेहल बिहारे, समिता चकोले, मंगला गवरे, वंदना भुरे, नगरसेवक संजय महाकाळकर यांच्यासह ओसीडब्ल्यूचे अधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत नेहरूनगर झोन अंतर्गत येणाऱ्या वस्त्यांमधील पाणी समस्येवर चर्चा करण्यात आली. झोनमधील प्रभावित क्षेत्रात पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. प्रभावित क्षेत्रात टँकरच्या फेऱ्या वाढविण्यात याव्यात आणि टिल्लू पंप वापरणाऱ्यांवर आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, असेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.
प्रत्येक वस्त्यांमध्ये समान पाणी पुरवठा करण्यात यावा, पाण्यासाठी कुणालाही त्रास होऊ नये, याची काळजी घेण्याचेही अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. यावर्षी पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. याची जाणीव आहे. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा आणि काटकसरीने पाण्याचा वापर करावा. अवास्तव पाणी वाया घालवू नये, असे आवाहन उपस्थित पदाधिकारी व नगरसेवकांनी यावेळी नागरिकांना केले. यासाठी व्यापक जनजागृती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.