नवी दिल्ली : नीट युजीसी पेपरफुटी प्रकरण हे केवळ पाटणा (बिहार) आणि हजारीबाग (झारखंड) पुरते मर्यादित आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.नीट युजीसी पेपरफुटी प्रकरणात आज (दि.२ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयाने म्हत्त्वाचा निकाल दिला. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले की, NEET पेपर लीक केवळ हजारीबाग आणि पाटणा शहरापुरते मर्यादित आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने एखाद्याच्या तक्रारीचे निवारण होत नसेल तर ते उच्च न्यायालयात जाऊ शकतात, असे न्यायालयाने म्हटले आहे. पेपरफुटी प्रकरण यामध्ये कोणतेही पद्धतशीर प्लॅन नसल्याचा आमचा निष्कर्ष आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहोत की, नीट पेपरफुटी प्रकरणात पद्धतशीरपणे बिघाड नाही. पेपरफुटीचा प्रभाव हा हजारीबाग आणि पाटणापुरता मर्यादित आहे.
आम्ही संरचनात्मक कमतरतांकडे लक्ष दिले आहे. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची ओळख सुनिश्चित करणे आणि पेपर लीक रोखण्यासाठी स्टोरेजसाठी एसओपी तयार करणे ही सरकार आणि एनटीएची जबाबदारी आहे. त्यामुळे NTA ने भविष्यात काळजी घ्यावी. अशा प्रकारची निष्काळजीपणा टाळली पाहिजे. NEET ची पुनर्परीक्षा घेण्याची मागणी आम्ही फेटाळत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.