Published On : Wed, Apr 10th, 2019

नागपुरात नीरीने साकारला वेस्ट मॅनेजमेंट पार्क

नागपूर : काचेच्या बॉटल्स किंवा वस्तू निसर्गातून नष्ट व्हायला एक लाख वर्ष लागतात. प्लास्टिक बॉटल्स किंवा पिशव्या ४५० पेक्षा जास्त वर्षपर्यंत नष्ट होऊ शकत नाही. तीच अवस्था खाद्यपदार्थ किंवा गुटखा, तंबाखूच्या पाऊचची आहे. थर्माकोलच्या वस्तू नष्ट व्हायला ५० पेक्षा जास्त वर्ष लागतात. रुग्णालयातून निघणारा कचराही तसाच धोकादायक आहे. हा सर्व कचरा एकाच प्रकारचा आहे असे गृहीत धरून एकाच कचरा कुंडीत जमा करताना आपण कधी या गोष्टीचा विचार केला आहे का? आतापर्यंत नसेल केला, पण यानंतर करावाच लागणार आहे. याबाबत अभ्यासपूर्ण व पर्यावरणाबाबत संवेदनशील मार्गदर्शन करणारा ‘वेस्ट मॅनेजमेंट पार्क’ नीरी व स्वच्छ असोसिएशन या एनजीओने साकारला आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी)च्या ६१ व्या स्थापना दिनानिमित्त हा पार्क नागरिक व विद्यार्थ्यांसाठी खुला करण्यात आला आहे. स्वच्छ असोसिएशनच्या सहकार्याने पार्क ची निर्मिती करण्यात आली आहे. आपल्या घरातून, रुग्णालये, उद्योग, कंपन्या किंवा संस्थांच्या कार्यालयातून निघणाऱ्या सर्व प्रकारच्या कचऱ्याचे वर्गीकरण, व्यवस्थापन व पुनर्वापराचे सविस्तर मार्गदर्शन या पार्कमध्ये मिळते. नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या मार्गदर्शनात हा पार्क साकार झाला. उपक्रमाच्या प्रमुख डॉ. अत्या कपले, स्वच्छच्या अनसूया काळे-छाबरानी व शेफाली दुधबडे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

Advertisement

खरंतर घरगुती कामात आवश्यक नसल्यास प्लास्टिक किंवा तत्सम धोकादायक वस्तूंना नकारच देणे गरजेचे आहे. मात्र विविध वस्तूंचा पुरवठा प्लास्टिकच्या साहित्यामध्येच होत असल्याने ते गरजेचे ठरते. पण या साहित्याचा शक्यतो पुनर्वापर करणे शक्य असल्यास तो करावा. ते शक्य नसेल तर घरगुती केरकचºयामध्ये त्याला मिक्स करू नये. प्लास्टिक, धातूचे व काचेचे साहित्य, सॅनिटरी नॅपकीन, इलेक्ट्रानिक्स उपकरणे, घरातील वैद्यकीय कचरा यासाठी स्वतंत्र डस्टबीन असणे नितांत गरजेचे आहे. कारण हा कचरा अत्यंत धोकादायक असून तो एकत्रितपणे गेल्यास त्याचे वर्गीकरण व नंतर रिसायकलिंग करणे गुंतागुंतीचे ठरते. टाकाऊ अन्नपदार्थ, भाजीपाला, पानेफुले या गोष्टींपासून कंपोस्ट करणे शक्य आहे व पर्यावरणास लाभदायक आहे. खर्डे, पेपर वेस्ट, फळांचे छिलके या गोष्टी लवकर नष्ट करता येतात. पण प्लास्टिक, काच, धातूंच्या वस्तू, तार, मुलांचे डायपर, सॅनिटरी नॅपकीन, केस, औषधांचा कचरा नष्ट करणे शक्य नाही.

यात इ-कचऱ्याच्या राक्षसाची आणखी भर पडली आहे. या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन देणारे मॉडेल्स पार्कमध्ये आहेत. पृथ्वी गिळंकृत केलेला प्लास्टिकचा कचरा, सोबत धातूंचा कचरा, इलेक्ट्रानिक्स साहित्याचा कचरा, वैद्यकीय कचरा पर्यावरणास किती भीषण हानी पोहचवू शकतो, याचे दर्शन मॉडेल्सच्या माध्यमातून घडविण्यात आले आहे. केवळ दुष्परिणामच नाही तर या कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन कसे करू शकतो, याचे मॉडेल्ससह मार्गदर्शन करवून देण्यात आले आहे.

ओला कचरा, सुका कचरा आणि धोकादायक कचरा याचे वर्गीकरण करून वेगवेगळ्या डस्टबीनमध्ये गोळा केल्यास आपण पर्यावरण व देशाचीही सेवा करू शकतो. केवळ शासकीय यंत्रणांवर अवलंबून न राहता आपलीही काही जबाबदारी आहे, याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करून देण्यात आला आहे. आपल्या छोट्या छोट्या चुका टाळल्या तर आपण पर्यावरण संवर्धनात हातभार लावू शकतो, हे समजून घेण्यासाठी विद्यार्थी व नागरिकांनीही नीरीच्या गेट नं. २ जवळील या वेस्ट मॅनेजमेंट पार्कला भेट द्यावी.

नाना मिसाळ यांची कलात्मकता
या पार्कमध्ये आणखी एक गोष्ट लक्ष वेधून घेते ती चित्रकार नाना मिसाळ यांची कलात्मकता. नीरी व स्वच्छच्या सहयोगाने त्यांनी निरुपयोगी व टाकाऊ असलेल्या साहित्यापासून सुंदर अशी कलाकृती साकार केली आहे. फुटलेले सीमेंटचे पाईप्स, लाकडाचे तुकडे, फरशा आणि फुटलेल्या टाईल्सना कलात्मक आकार देऊन सजविले आहे. लोकडांच्या ओंडक्यांना प्राण्यांचा सुबक आकार दिला आहे. शिवाय इलेक्ट्रानिक्स, मेडिकल वेस्ट, बांधकाम साहित्य, प्लास्टिक कचरा दर्शविणारे मॉडेल्स तयार करण्यात अनसूया काळे, शेफाली दुधबडे यांच्यासह त्यांनी योगदान दिले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement