Published On : Sat, Feb 7th, 2026
By Nagpur Today Nagpur News

गडचिरोलीत नक्षलवाद अखेरच्या टप्प्यात; केवळ ७ नक्षलवादी शिल्लक!

३१ मार्चपर्यंत शरणागती न दिल्यास थेट कारवाईचा इशारा
Advertisement

गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद आता अखेरच्या श्वासावर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील अबूजमाड जंगल परिसरात मंगळवार, ३ फेब्रुवारीच्या रात्रीपासून सलग तीन दिवस सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी ७ जहाल नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर राज्य सरकारने मिळून ७१ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

ठार करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये गडचिरोली विभागीय समितीचा प्रभारी, पश्चिम सब-झोनल ब्युरोचा प्रभारी तसेच कंपनी क्रमांक १० चा प्रमुख प्रभाकर याच्यासह एक कमांडर, एक पीपीसीएम, दोन एसीएम दर्जाचे वरिष्ठ नक्षलवादी आणि दोन दलम सदस्य यांचा समावेश आहे.

या सर्व मृत नक्षलवाद्यांची ओळख गुप्तचर विभागाने निश्चित केली असून, आता जिल्ह्यात केवळ ७ नक्षलवादी उरले आहेत. या उरलेल्या नक्षलवाद्यांना ३१ मार्चपर्यंत आत्मसमर्पण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निर्धारित मुदतीत शरणागती न दिल्यास प्रभाकरसारखाच परिणाम भोगावा लागेल, असा स्पष्ट इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला.

शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसपी नीलोत्पल यांनी या संपूर्ण एन्काऊंटरची सविस्तर माहिती दिली.

Advertisement

चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये २५ लाखांचा इनामी, तेलंगणातील इसरोजीवाडा येथील प्रभाकर उर्फ रवी उर्फ प्रकालवीर उर्फ स्वामी उर्फ लोकेती चंदरराव (वय ५७), १६ लाखांचा इनामी कंपनी क्रमांक ५ चा कमांडर पागु मोडकाम (वय ३०, बीजापूर), ८ लाखांचा इनामी पीपीसीएम अनिला उर्फ बुदरी कोवाची (वय २४, सुकमा) यांच्यासह इतर वरिष्ठ नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

सलग यशस्वी कारवायांमुळे गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद संपुष्टात येण्याच्या दिशेने निर्णायक टप्पा गाठल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.