नागपूर :आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत.या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहे. यातच खासदार नवनीत राणा या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
लक्ष्मीच्या हाती कमळ असतेच, त्याबद्दल कुणी शंका बाळगण्याचे कारण नाही, असे सांगून भाजप प्रवेशाचे संकेत खासदार नवनीत राणा यांनी दिले असले, तरी त्यांच्या समर्थकांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली. अजून नवनीत राणा भाजपमध्ये आलेल्या नाहीत, असे स्पष्ट विधान केले. ते नागपूर येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
खासदार नवनीत राणा यांनी शनिवारी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीबाबत भूमिका जाहीर करताना सांगितले की, मी युवा स्वाभिमान पक्षाची कार्यकर्ती आहे, त्यामुळे आमचा पक्ष जो निर्णय घेईल, तो मान्य आहे. आम्ही (युवा स्वाभिमान पक्ष) एनडीएचे घटक पक्ष आहोत. त्यामुळे आमचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस जो आदेश देतील, त्या आदेशाचे आम्ही पालन करू. तर आमदार रवी राणा यांचा निर्णयच शेवटचा असेल, असेही त्या म्हणाल्या.त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये नवनीत राणा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.