Published On : Wed, Jun 13th, 2018

नाट्यनगरी ही मुंबईची खरी ओळख – सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे

Advertisement

मुंबई : इतर शहरांच्या तुलनेत मुंबईमध्ये नाट्यनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच मुंबईची खरी ओळख ही नाट्यनगरी म्हणून असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे केले.अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने ९८ वे अखिल भारतीय नाट्य संमेलन मुलुंड येथील कवी कालिदास नाट्यमंदिर आवारातील सुधा करमरकर सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या नाट्य संमेलनाचे उद्घाटन जेष्ठ नाट्यकर्मी सतीश आळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी श्री. तावडे बोलत होते.

या नाट्य संमेलनास माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा खासदार शरद पवार, किरीट सोमय्या, आमदार सरदार तारासिंग, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, ९८ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ अभिनेत्री किर्ती शिलेदार, मावळते अध्यक्ष जयंत सावरकर, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे प्रसाद कांबळी, जेष्ठ नाट्यकर्मी सतीश आळेकर तसेच नाट्य क्षेत्रातील दिग्गज कलाकार, निर्माते आदी उपस्थित होते.

Advertisement

बऱ्याच वर्षानंतर मुंबई येथे मराठी नाट्य संमेलन होत आहे. या नाट्य संमेलनात विविध प्रकारची नाटके सादर होणार आहेत. या नाटकांमध्ये प्रबोधनात्मक नाटके असल्याने ती नक्कीच मुंबईकरांना आवडतील, असे श्री.तावडे यावेळी म्हणाले.

नाटक हे राजाश्रित नसावे तर ते राजपुरस्कृत असावे. असे सांगून ज्या क्षेत्रातील संमेलन असेल त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीलाच स्वागताध्यक्ष करावे, अशी अपेक्षा श्री.तावडे यांनी व्यक्त केली.

दरम्यान दुपारी चार वाजता मुलुंड रेल्वे स्थानक येथून श्री.तावडे यांच्या उपस्थितीत नाट्य दिंडी काढण्यात आली. या नाट्य दिंडीत नाट्य कलावंत व रसिकांनी सहभाग घेतला.