Published On : Thu, Dec 20th, 2018

स्वयंरोजगार कर्ज प्रस्तावासंदर्भात राष्ट्रीयकृत बँकांची कार्यशाळा उत्साहात

Advertisement

नागपूर महानगरपालिका व दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानचे आयोजन

नागपूर : दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान स्वयंरोजगार कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या कर्ज प्रस्तावासंदर्भातील संभ्रम व अडचणींवर चर्चा करून त्या सोडविण्याच्या उद्देशाने बुधवारी (ता. १९) नागपूर महानगरपालिका समाज कल्याण विभाग व दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या वतीने राष्ट्रीयकृत बँकांची एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

महाल येथील नगर भवन येथे आयोजित कार्यशाळेमध्ये उपायुक्त रंजना लाडे, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त वरिष्ठ प्रबंधक श्रीराम बांधे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक नुकेतन गजभिये, युनियन बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक भारत मेश्राम यांच्यासह विविध बँकांचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी उपायुक्त डॉ. रंजना लाडे, बँक ऑफ इंडियाचे निवृत्त वरिष्ठ प्रबंधक श्रीराम बांधे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक नुकेतन गजभिये, युनियन बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक भारत मेश्राम यांनी शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांच्या कर्ज प्रस्तावाबाबतचे संभ्रम, येणाऱ्या अडचणी आदींची चर्चा करून उपस्थित बँक प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन केले.

प्रास्ताविकात उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांनी कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. सरकारच्या योजनांबाबत नागरिकांमध्ये निर्माण झालेली उदासीनता दूर करणे तसेच नागरिकांचा विश्वास दृढ करण्याच्या हेतूने नागपूर महानगरपालिका व राष्ट्रीयकृत बॅंक यांनी योग्य समन्वय साधून काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बँक ऑफ इंडियाचे निवृत्त वरिष्ठ प्रबंधक श्रीराम बांधे यावेळी म्हणाले, गरीब लोकांना स्वावलंबी बनवून त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या उद्देशाने दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाद्वारे स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यात येते. लोकांचा आर्थिक स्तर वाढावा, त्यांच्यातील कौशल्याला एक दिशा मिळावी यासाठी शासनाने पुढाकार घेतला असताना त्यांना आर्थिक सहाय करणे हे बँकांचे कर्तव्य आहे. कर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे तयार असणाऱ्यांना त्वरित कर्ज मंजूर करून शासनाच्या योजनेला सहकार्य करा, असे आवाहनही श्रीराम बांधे यांनी यावेळी केले.

बँकेमध्ये कर्तव्‍य बजावताना लोकांची सेवा म्हणूनच काम करा. शासनाच्या विविध योजनांशी संबंधित माहिती घ्यायला येणाऱ्या प्रत्येकाला योग्य माहिती देऊन त्यांच्या शंकांचे निरसन करा, असेही ते म्हणाले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे जिल्हा समन्वयक नुकेतन गजभिये यांनी स्वयंरोजगारासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार १५ दिवसांमध्ये सर्व संबंधित बँकेने कार्य प्रस्ताव निर्गमित करावे, असे निर्देशही नुकेतन गजभिये यांनी यावेळी दिले.

संचालन भावना यादव यांनी केले. ज्योत्स्ना देशमुख यांनी आभार मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रितेश बांते, नूतन मोरे, नीता गोतमारे, मित्रा मोहोड, ज्योती शेगोकर, विनय त्रिकोलवार, शशी फुलझेले, प्रमोद खोब्रागडे यांच्यासह सर्व झोनच्या समुदाय संघटकांनी सहकार्य केले.