Published On : Mon, Dec 16th, 2019

उत्कृष्ट कर्मचारी संवादासाठी महानिर्मितीला राष्ट्रीय पुरस्कार

Advertisement

कॉर्पोरेट, सार्वजनिक उपक्रम, शासकीय तथा खाजगी कंपन्यांमध्ये जनसंपर्क-जाहिरात-प्रकाशन क्षेत्रात कार्यरत अधिकाऱ्यांच्या पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्यावतीने हैद्राबाद येथील हॉटेल “द मनोहर” येथे १३ ते १५ डिसेंबर तीन दिवसीय ४१ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले.

ह्या अधिवेशनाच्या निमित्ताने विविध संवर्गासाठी राष्ट्रीय पुरस्कारांची योजना जाहीर करण्यात आली होती. देशभरातील नवरत्न तसेच नामांकित अश्या सुमारे ५२ कंपन्या/संस्थांनी यामध्ये सहभाग नोंदविला व या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या हस्ते परीक्षण करण्यात आले. अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत “उत्कृष्ट कमर्चारी संवाद” ह्या संवर्गामध्ये महानिर्मितीला दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.

महानिर्मितीचे कार्यकारी संचालक(मानव संसाधन) भीमाशंकर मंता आणि अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांनी हा पुरस्कार या समारंभाचे प्रमुख पाहुणे तेलंगणा शासनाचे गृह मंत्री नामदार मोहम्मद मेहमूद अली यांचे हस्ते स्वीकारला. याप्रसंगी मंचावर पि.आर.एस.आय.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अजित पाठक, सेक्रेटरी जनरल निवेदिता बॅनर्जी प्रामुख्याने उपस्थित होत्या. तर देशभरातील सुमारे ३०० जनसंपर्क अधिकारी-व्यावसायिक सहभागी झाले होते.

महानिर्मितीतर्फे प्रभावी कर्मचारी संवादासाठी व्हॉटसअप या समाज माध्यमाद्वारे “कनेक्ट एम.एस.पि.जी.सी.एल.” ब्रॉडकास्ट ग्रुप करून जनसंपर्कातील नवनवीन आयुधांच्या सहाय्याने सुमारे ३५०० अधिकारी-कर्मचाऱ्यांना थेट वीज क्षेत्रातील दैनंदिन घडामोडी, व्यक्ती विशेष, दिन विशेष, कला,क्रीडा, नाट्य, सेवानिवृत्ती, प्रशिक्षण विषयक गतिमानतेने माहिती दररोज दिल्याने संघभावना, सुदृढ स्पर्धा, वैयक्तिक प्रोत्साहन, ग्राहक समाधान आणि ऑनलाइन फीडबॅक यांसारख्या अनेक बाबीतून अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्तमरीत्या जोडण्यात आले.

या अभिनव उपक्रमाच्या यशस्वितेमागे महानिर्मितीचे अतिरिक्त जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते यांचे अथक परिश्रम आहेत तर या उपक्रमाला माहिती तंत्रज्ञान विषयक सहाय्याचे काम महानिर्मितीचे प्रोग्रामर सुमित पाटील हे कुशलतेने सांभाळत आहेत.

महानिर्मिती वरिष्ठ व्यवस्थापनाच्या सहकार्यातून हि अभिनव संकल्पना आज संपूर्ण महानिर्मितीमध्ये प्रभावी संवादाचे माध्यम ठरली आहे.