

नागपूर– शहरातील नंदनवन परिसरात हुंडाबळी आणि सातत्यपूर्ण मानसिक छळामुळे माय-लेकीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले असून परिसरात शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये व्यंकटेशनगर परिसरातील रहिवासी आणि शिक्षिका संगीता श्रीराम ढबाळे (वय ५२) तसेच त्यांची कन्या आकांक्षा ब्रह्मे (वय २९) यांचा समावेश आहे. दोघींनी स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले.
दरवाजा न उघडल्याने उघडकीस आला प्रकार-
१ मे रोजी सकाळी सुमारे ९ वाजता घराचा दरवाजा बराच वेळ न उघडल्याने नातेवाईकांना संशय आला. दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यानंतर समोर आलेले दृश्य अतिशय हृदयद्रावक होते. दोघींचेही मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
विवाहानंतर सुरू झाला छळाचा आरोप-
नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, आकांक्षाच्या विवाहानंतरच तिच्या आयुष्यात छळाचे सत्र सुरू झाले होते.सतत माहेरहून पैसे आणण्याचा दबाव,मुलगा व्हावा म्हणून मानसिक दबाव,मुलगी झाल्यानंतर टोमणे आणि मानसिक छळ,नवजात बाळाच्या मृत्यूनंतर आलेला प्रचंड मानसिक धक्का,या सर्व घटनांमुळे माय-लेकी मानसिकदृष्ट्या खचल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जमीन नावावर करण्याचा दबावही-
तक्रारीत असेही नमूद करण्यात आले आहे की सासरच्या मंडळींकडून शेतीची जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या सततच्या मानसिक आणि आर्थिक त्रासामुळे दोघींनी टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप आहे.
पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल-
मृतांच्या भावाच्या तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये पती लोकश सुधाकर ब्रह्मे,सासरे सुधाकर ब्रह्मे,सासू अनुसया ब्रह्मे,ननंद प्राची डफ,ननंदेचा पती अमोल डफ यांचा समावेश आहे. या सर्वांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा तसेच हुंडाबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. ही घटना पुन्हा एकदा हुंडा प्रथेचे भीषण वास्तव समोर आणते असून समाजातील संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे नागपुरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.








