Published On : Wed, Mar 28th, 2018

चर्चेला राज्यातला मंत्री देऊन अण्णांचा अपमान : नाना पटोले

Advertisement

Nana Patole
नवी दिल्ली : जनलोकपालसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं दिल्लीतल्या रामलीला मैदानावर सहाव्या दिवशीही उपोषण सुरुच आहे. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले नेते नाना पटोले यांनी आज अण्णांची भेट घेत, त्यांनी या आंदोलनाला पाठिंबा असल्याचं सांगितलं.

”अण्णांच्या सर्व मागण्या या केंद्राच्या अखत्यारितील आहेत. मात्र त्यांचा अपमान करण्यासाठी राज्यातला मंत्री पाठवण्यात आला आहे,” अशी टीकाही नाना पटोले यांनी केली.

”एवढ्या वयाचा माणूस, जो आज देशासाठी लढतोय, त्याचा अपमान ही जनता कधीही सहन करु शकत नाही. अण्णांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहून माझ्याही डोळ्यात अश्रू आले,” असं नाना पटोले म्हणाले.

अण्णांशी चर्चा करण्याची जबाबदारी अगोदरपासूनच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देण्यात आलेली आहे. अण्णांचं आंदोलन सुरु झाल्यापासून गिरीश महाजन दिल्लीत तळ ठोकून आहेत. मात्र गिरीश महाजनांच्या शिष्टाईला अद्याप तरी अपयश आलेलं आहे. त्यामुळे केंद्राच्या अखत्यारितील मागण्या असताना राज्यातल्या मंत्र्यावर जबाबदारी देऊन अण्णांच्या आंदोलनाचं महत्त्व कमी करण्याचा हा प्रकार आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.