
नागपूर : वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक जबाबदाऱ्या, कुटुंबाची साथ आणि स्वतःची स्वप्ने यांचा सुरेख समतोल साधत नागपूरच्या डॉ. श्रुती नीरज सवालाखे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. नवी दिल्लीतील क्राउन प्लाझा येथे आयोजित ‘मिसेस युनायटेड नेशन्स २०२६’ स्पर्धेत त्यांनी विजेतेपद पटकावले. यासोबतच ‘मिसेस युनायटेड नेशन्स अर्थ’ हा किताबही त्यांनी आपल्या नावावर केला. त्यांच्या या यशामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. श्रुती या डॉ. रवी चरडे यांच्या कन्या असून दंत शल्यचिकित्सक आणि कॉस्मेटोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी कॉस्मेटोलॉजीमधील दोन फेलोशिप पूर्ण केल्या असून हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये एमबीएची पदवी मिळवली आहे. सध्या त्या नागपुरातील जय इन्स्टिट्यूट आणि भानुकृपा हॉस्पिटलमध्ये संचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेतील यशानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे.
मुकुटापेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व-
या स्पर्धेतील डॉ. श्रुती यांच्या प्रवासातील विशेष बाब म्हणजे त्यांनी सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वापलीकडे माणुसकीचे महत्त्व अधोरेखित केले. स्पर्धेदरम्यान एका परदेशी स्पर्धकाची प्रकृती बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी डॉक्टर म्हणून तिला मदत केल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या या कृतीतून वैद्यकीय सेवेचे महत्त्व आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करण्याची भावना दिसून आली.
त्यांच्या मते, यश म्हणजे केवळ पुरस्कार किंवा मुकुट मिळवणे नव्हे, तर आपल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग इतरांच्या मदतीसाठी करणे होय. मुकुट व्यक्तिमत्त्वाला शोभा देतो; मात्र माणुसकी माणसांच्या मनात आदर निर्माण करते, हा संदेश त्यांच्या कृतीतून समोर आला.
‘ऑपरेशन सिंदूर’मधून भारतीय अस्मितेचे दर्शन-
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताचे प्रतिनिधित्व करणे हा अभिमानाचा अनुभव असल्याचे डॉ. श्रुती यांनी सांगितले. त्यांच्या सादरीकरणात ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि भारतीय तिरंग्यापासून प्रेरित देशभक्तिपर संकल्पनेला विशेष स्थान देण्यात आले होते. या माध्यमातून त्यांनी साहस, देशप्रेम आणि भारतीय अस्मितेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
कुटुंब आणि करिअरसोबत स्वप्नांनाही द्या संधी-
डॉ. श्रुती यांचे पती डॉ. नीरज सवालाखे हे प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट असून त्यांचा मुलगा जय सवालाखे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळतो. कुटुंबाचा पाठिंबा, शिस्त आणि योग्य नियोजन यांच्या बळावर महिलांना व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच स्वतःची स्वप्नेही पूर्ण करता येतात, असा त्यांचा विश्वास आहे.
महिलांनी कुटुंब आणि करिअर यांच्यासोबत स्वतःच्या आकांक्षांनाही महत्त्व द्यावे. वय, परिस्थिती किंवा कौटुंबिक जबाबदाऱ्या यांना आपल्या क्षमतेची मर्यादा समजू नये. आत्मविश्वास आणि जिद्द असेल, तर प्रत्येक महिला स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकते, असा संदेश त्या देतात.
महिला सक्षमीकरणासाठी योगदान देण्याचा संकल्प-
या यशानंतर वैद्यकीय कौशल्य, नेतृत्वक्षमता आणि वैयक्तिक अनुभवांच्या माध्यमातून महिलांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकासाला प्रोत्साहन देण्याची डॉ. श्रुती यांची इच्छा आहे. महिला सक्षमीकरणासह समाजात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या उपक्रमांमध्ये योगदान देण्याचाही त्यांचा मानस आहे.
प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या स्वप्नांसाठी खंबीरपणे उभे राहावे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा आणि परिस्थितीपुढे हार मानू नये, हा त्यांच्या यशाचा महत्त्वाचा संदेश आहे. एखादी महिला स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पुढे येते, तेव्हा ती केवळ स्वतःचे आयुष्य बदलत नाही, तर पुढील पिढीसाठीही प्रेरणादायी ठरते. डॉ. श्रुती सवालाखे यांच्यासाठी हा मुकुट केवळ सन्मानाचे प्रतीक नसून महिलांना प्रेरणा देण्याची आणि समाजासाठी अर्थपूर्ण योगदान देण्याची जबाबदारीही आहे.



