
नागपूर – लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांचा प्रत्यक्ष सहभाग अत्यावश्यक असल्याचे सांगत विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (वेद) कौन्सिलच्या अध्यक्षा रिना सिन्हा यांनी नागपूरकरांना मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. १५ जानेवारी रोजी होणाऱ्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी वेद कौन्सिलतर्फे प्रेस क्लब, नागपूर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.
या पत्रकार परिषदेत रिना सिन्हा म्हणाल्या की, वेद कौन्सिल ही नागपूर व विदर्भाच्या आर्थिक प्रगतीसाठी काम करणारी संस्था असून, प्रशासन, उद्योगजगत, सामाजिक संस्था आणि नागरिक यांच्यात समन्वय साधून शहराच्या विकासासाठी संस्था कार्यरत आहे.
मतदानाच्या दिवशी अनेक पात्र मतदार घराबाहेर न पडण्याची प्रवृत्ती वाढत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. विशेष म्हणजे राजकीय पक्षांशी जोडलेले मतदारही अनेकदा मतदान टाळतात, ही बाब लोकशाहीसाठी धोक्याची असल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून, माहितीपूर्ण निर्णय घेणे, निवडून दिलेल्या प्रतिनिधींना त्यांच्या कामाबाबत जाब विचारणे आणि सातत्याने नागरिक म्हणून भूमिका बजावणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांचा सक्रिय सहभाग असेल, तरच पारदर्शक प्रशासन आणि टिकाऊ शहरी विकास साध्य होऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.
मतदान हा आपल्या अपेक्षा आणि प्राधान्यक्रम मांडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग असून, विकासाचे ठोस परिणाम हवे असतील तर प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
या पत्रकार परिषदेला वेद कौन्सिलचे संयुक्त सचिव अली असगर वाघ, संयुक्त सचिव अमित येनुरकर तसेच कार्यकारिणी सदस्य आतिश जिंदाल आणि नवीन माळेवार उपस्थित होते.








