नागपूर : नागपुरातील सिटी सर्व्हे विभागाच्या एका अधिकाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना बुधवारी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली असून सिव्हिल लाइन्समधील प्रशासकीय इमारत क्रमांक 1 मधील सिटी सर्व्हे कार्यालयात अधिकाऱ्याला लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
प्रकाश बाळकृष्ण निंदेकर (४६) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव असून परिरक्षण भूमापन म्हणून काम करतात.एसीबीच्या म्हणण्यानुसार, निंदेकरला जमिनीच्या मालकीच्या कागदपत्रात फेरफार करण्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. तक्रारदाराला त्याच्या पालकांच्या घराच्या मालकीच्या कागदपत्रावर स्वतःचे नाव करायचे होते. त्यांनी सिटी सर्व्हे कार्यालयात अर्ज केला. आवश्यक बदल करण्यासाठी निंदेकर यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तरुणांनी तातडीने एसीबीकडे तक्रार दाखल केल्याने निंदेकरला रंगेहाथ पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. प्रकाश निंदेकर याच्याविरुद्ध सदर पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अप्पर पोलीस अधीक्षक मधुकर गीते, पोलीस उपअधीक्षक महेश चाटे, अनामिका मिर्झापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लकडे , सारंग बालपांडे, गीता चौधरी, आशु श्रीरामे, अस्मिता मेश्राम आणि अमोल भक्ते यांनी केली.