नागपूर : सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने रस्त्यात अडवून शिवीगाळ करत तरुणाच्या डोक्यात दगडाने वार केला. त्यानंतर खाली पाडून गळा आवळण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ही घटना सोमवारी सायंकाळी सोमवारी क्वार्टर परिसरातील डुक्कर चौकाजवळ घडली. वैभव उर्फ विक्की दिलीप जामगाडे हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. दुकान बंद करून घरी जात असताना आरोपी अखिलेश राजू रंगारी याने त्यांना रस्त्यात अडवले.
जुन्या वादातून दोघांमध्ये वाद झाला. यावेळी अखिलेशने वैभव यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यात दगडाने वार केला. या हल्ल्यात वैभव खाली कोसळल्यानंतर आरोपीने हाताने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हल्ल्यानंतर वैभव यांनी आरडाओरड करून तेथून कसाबसा बचाव केला आणि पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तक्रारीच्या आधारे सक्करदरा पोलिसांनी अखिलेश रंगारी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. आरोपीच्या पूर्वीच्या गुन्हेगारी नोंदींसह प्रकरणातील इतर बाबींचा पोलीस तपास करीत आहेत.





