Published On : Sat, Nov 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

लग्नाला नकार देताच तरुणीला अॅसिड हल्ल्याची धमकी; नागपुरात छळ, आरोपीला अटक

इन्स्टाग्रामवरील मैत्रीचे रूपांतर त्रासात; तरुणीला रस्त्यात अडवून मारहाण आणि विनयभंग
Advertisement

लग्नाला नकार देताच तरुणीला अॅसिड हल्ल्याची धमकी; नागपुरात छळ, आरोपीला अटक

नागपूर : लग्न करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरून एका तरुणाने २१ वर्षीय युवतीचा छळ केल्याची घटना नागपुरात उघडकीस आली आहे. लग्नासाठी दबाव टाकत तरुणीला धमकावण्यात आले. लग्नास तयार न झाल्यास तिचे फोटो सार्वजनिक करून बदनामी करण्यासह चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकीही देण्यात आली. एवढ्यावरच न थांबता आरोपीने तरुणीला रस्त्यात अडवून मारहाण आणि अश्लील कृत्य केले. या प्रकरणी मानकापूर पोलिसांनी राहुल परिहार याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ मध्ये इन्स्टाग्रामच्या माध्यमातून पीडित तरुणीची राहुल परिहार याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र, काही काळानंतर राहुलने तिच्याकडे लग्नाचा तगादा लावला. तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर त्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तिच्या नातेवाइकांकडेही चौकशी करून तो तिच्यावर दबाव निर्माण करीत होता.

२६ नोव्हेंबर रोजी तरुणी मेडिकल रुग्णालयातून घरी जात असताना दिव्यनगरी परिसरात राहुलने तिला गाठले. ऑटोमधून उतरून पायी जात असलेल्या तरुणीला त्याने रस्त्यात अडवले. यावेळी लग्न होऊ देणार नाही, तसेच तिचे फोटो दाखवून बदनामी करेल, अशी धमकी दिली. चेहऱ्यावर अॅसिड फेकण्याची धमकी देत तिच्याशी धक्काबुक्की केली आणि थप्पड मारली. याशिवाय तिचा हात पकडून अश्लील कृत्य केल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

या घटनेनंतर तरुणीने मानकापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत राहुल परिहार याला अटक केली. पुढील तपास मानकापूर पोलीस करीत आहेत.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.