
नागपूर – हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गटात विसंवाद चव्हाट्यावर आला आहे. या पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव अनेक महिन्यांपासून आघाडीवर असतानाच अचानक आदित्य ठाकरेंना पुढे करण्याच्या चर्चेला वेग आल्याने नवा पेच निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरे स्वतः आदित्य ठाकरेंना ही जबाबदारी द्यावी, यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी समन्वय साधण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या घडामोडींवर भास्कर जाधवांनी नाराजीची ठिणगी पेटवली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के अटीचा दावा पूर्णपणे चुकीचा असून नियमावलीत अशा कोणत्याही तरतुदीचा उल्लेख नाही, असा आरोप त्यांनी केला. सरकारकडून मुद्दाम गोंधळ निर्माण केला जात असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं.
तसेच, “मी ठामपणे आणि थेट भूमिका मांडतो, म्हणूनच मला मागे सारण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप जाधवांनी केला. सरकार पडल्यानंतर अनेक मुद्द्यांवर चुकीची माहिती जनतेसमोर ठेवली गेली असून विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांबाबतही गैरसमज पसरविण्यात आल्याची टीका त्यांनी केली. उपमुख्यमंत्री पदाला घटनात्मक आधार नाही, या उद्धव ठाकरेंच्या भूमिकेलाही त्यांनी पाठिंबा दिला. विरोधी पक्षनेतेपदाचे अधिकार प्रभावी असल्यामुळे या पदाभोवती राजकीय चढाओढ वाढल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच, महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर सरकारचं धोरण असंवेदनशील असल्याची टीका त्यांनी केली. गंभीर प्रकरणांत तपास सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री आरोपींना पाठीशी घालतात, अशा आरोपांनी त्यांनी सरकारला धारेवर धरलं.
अधिवेशनाच्या उंबरठ्यावर उभ्या ठाकरे गटातील या अंतर्गत मतभेदांनी राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षनेतेपदाचा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.









