
नागपूर – राज्यभरात दिवसेंदिवस वाढत्या बिबट्या हल्ल्यांच्या घटनांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज अधिवेशनात अनोखी घटना पाहायला मिळाली. जुन्नरच्या गंभीर बिबट्या समस्येची जाणीव करून देण्यासाठी आमदार शरद सोनावणे यांनी प्रतीकात्मक आंदोलन करत ‘बिबट्या’च्या वेशात विधानभवन परिसरात हजेरी लावली.
जुन्नर तालुक्यात गेल्या काही वर्षांत बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये 55 नागरिकांचा मृत्यू झाला असून जनजीवन हादरले आहे. तरीही प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी वारंवार केला आहे.
दरम्यान, आज सकाळी नागपूरच्या पारडी परिसरातही बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. अचानक दिसलेल्या बिबट्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वनविभागाने मोठ्या प्रयत्नांनंतर त्या बिबट्याला जेरबंद केले.
सोनावणे यांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनामुळे बिबट्या समस्येवरील चर्चा अधिवेशनात जोर धरतेय, तर वनविभाग आणि सरकारवर ठोस उपाययोजनांसाठी दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.









