
नागपूर – हिवाळी अधिवेशनाची नागपूरमध्ये दणदणाट सुरू असताना, आमदार निवासातील कँटीननेही ‘भोजन महोत्सवा’ची तयारी पूर्ण केली आहे. ७ डिसेंबरपासून येथे रोज ३ हजारांहून अधिक लोकांसाठी भव्य जेवणयोजना सुरू झाली असून, यंदाचा साहित्यसाठा पाहून कुणाच्याही भुवया उंचावतील.
किचनमध्ये दररोज लागणारे ६ हजार अंडी, १३० किलो मटण, तसेच मोठ्या प्रमाणातील कडधान्य, भाज्या आणि नाश्त्याचे साहित्य या सर्वांचा तगडा साठा तयार ठेवण्यात आला आहे. आमदार, त्यांचे सहकारी, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सुरक्षा दलातील जवान—अशा मोठ्या गर्दीची भूक भागवण्यासाठी हे किचन २४ तास धावते आहे.
जेवणात काय खास?
शाकाहारी मेन्यूमध्ये वांग्याचे भरीत, पालक–पनीर, मेथी–लसूण, झुणका, मिक्स व्हेज, डाळ तडका, पोळी–भाकरी आणि भात यांचा समावेश असून, रोजच्या जेवणात ‘घरगुती चवीचा’ अनुभव देण्याचा प्रयत्न आहे.
नाश्त्यात दक्षिणेचा तडका-
इडली, डोसा, उत्तपम, उपमा, आलू पोहा, चना–रसा, तसेच ऑम्लेट–ब्रेड अशी लज्जतदार पदार्थांची मेजवानी सकाळी ६ ते ११ आणि संध्याकाळी ४ ते ७ यावेळेत उपलब्ध आहे.
हिवाळी अधिवेशनामुळे सुरक्षा व्यवस्थाही सज्ज झाली असून, आमदार निवासाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांची सतत नजर आहे. एकूण ४०० कर्मचारी कँटीनच्या स्वयंपाकापासून सर्व्हिस, स्वच्छता आणि व्यवस्थापनापर्यंत सर्व कामे सुरळीत पार पाडत आहेत, अशी माहिती संचालक यांनी दिली.









