Published On : Wed, Oct 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या वाडी फ्लायओव्हरवर भीषण अपघात; ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गायधने यांचा मृत्यू

भरधाव दुचाकीच्या धडकेत तिघे जखमी
Advertisement
नागपूरच्या वाडी फ्लायओव्हरवर भीषण अपघात; ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गायधने यांचा मृत्यूनागपूर : शहरातील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमरावती मार्गावरील वाडी फ्लायओव्हरवर मंगळवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ पत्रकार मिलिंद काशीनाथ गायधने (वय ६०) गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघेही जखमी झाले असून, एका कारचेही नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडगंज येथील आदित्य दीपक खंडेलवाल हे मंगळवारी रात्री कुटुंबासह एमजी विंडसर कारने गरबा खेळण्यासाठी अमरावती रोडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी वाडी फ्लायओव्हरवर मागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने (एमएच-४९-सीव्ही-३३००) पुढे जाणाऱ्या मिलिंद गायधने यांच्या दुचाकीला (एमएच-३०-क्यू-३६३५) धडक दिली.

या धडकेत गायधने गंभीर जखमी झाले. त्यानंतर संबंधित दुचाकीची कारलाही धडक बसल्याने कारचे नुकसान झाले. अपघातात दुचाकीवरील चालक आणि त्याच्यासोबत असलेली व्यक्तीही जखमी झाली. तिघांनाही उपचारासाठी लक्ष रुग्णालयात दाखल करण्यात आले. गायधने यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारासाठी रामदासपेठ येथील एआरआयएस रुग्णालयात हलवले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी तक्रारीच्या आधारे वाडी पोलिसांनी दुचाकीचालक आश्रय डागा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पत्रकारिता क्षेत्रात शोककळा-

ज्येष्ठ पत्रकार मिलिंद गायधने यांनी आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीत अनेक प्रमुख वृत्तपत्रांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. वृत्तसंकलन, संपादन आणि सामाजिक विषयांवरील वैचारिक लेखनाच्या माध्यमातून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाने पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.