Published On : Tue, Nov 30th, 2021

नागपूर शहरात लसीकरणाचा ३० लाख डोजचा टप्पा पार

पात्र सर्व व्यक्तींनी लस घेण्याचे मनपा आयुक्तांचे आवाहन

नागपूर: कोरोना संसर्गाच्या बचावासाठी नागपूर शहरामध्ये मनपाद्वारे लसीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. शहरातील जास्तीत जास्त पात्र व्यक्तींचे लसीकरण व्हावे यासाठी मनपाद्वारे सुरू असलेल्या लसीकरण कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नागपूर शहरात कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाने ३० लाख डोजचा टप्पा पार केला असून आतापर्यंत शहरात ३० लाख ६० हजार कोव्हिड लसीकरणाचे डोज पूर्ण झाले आहेत.

Advertisement

नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात १५० वर लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून १८ वर्षावरील वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. नागपुरात लसीकरणासाठी १९.७३ लाख पात्र नागरिक असून या मधून १९ लाखाहून अधिक पहिला आणि ११ लाखांच्यावर दुसरा डोज देण्यात आला आहे. शहरात पहिला आणि दुसरा डोज मिळून ३०.६० लाख डोजेस पूर्ण झाले आहेत. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना लसीकरणाचे दोन्ही डोज पूर्ण करणे तसेच ज्यांनी अद्याप एकही डोज घेतलेला नाही त्यांनी आपले लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.

अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की, मनपा आरोग्य विभागानुसार १६ जानेवारीपासून नागपुरात लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्पयात आरोग्य सेवक, डॉक्टर, शासकीय कर्मचारी यांना लस देण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना, आजाराने ग्रस्त नागरिकांना लस देण्यात आली. आता १८ वर्षावरील सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. परदेशात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, दिव्यांग, भिक्षेकरू आणि ज्यांच्याकडे आधार कार्ड सुद्धा नाही अशा नागरिकांना सुद्धा मनपातर्फे लस देण्यात येत आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागानुसार आता ‘हर घर दस्तक’ मोहिम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत लस न घेतलेल्या पात्र नागरिकांचा शोध घेऊन त्यांना लसिकरणाकरीता प्रवृत्त करण्यात येत आहे व याप्रकारे शहरातील १००% पात्र नागरिकांना डोज देण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. नागरिकांनी सुद्धा या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याचेच फलित आज लसीकरणाचा टप्पा ३० लाखांच्यावर गेला आहे.

कोव्हिडच्या संसर्गापासून बचावासाठी नियमांचे पालन आणि लसीकरण हेच सर्वात मोठे अस्त्र आहे. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांकडे लक्ष न देता पात्र नागरिकांनी आपले लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, असेही आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement