नागपूर :नागपूर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होत असतानाच, निकालाच्या आदल्या दिवशी नागपूर टुडे न्यूजने जाहीर केलेला एक्सिट पोल जवळपास तंतोतंत ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. मतमोजणीतील सुरुवातीचे आणि आतापर्यंतचे कल पाहता, नागपूर टुडेने वर्तवलेला अंदाज अचूक ठरल्याने या एक्सिट पोलची शहरात आणि राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे.
‘नागपूर टुडे’ न्यूजच्या एक्सिट पोलनुसार, नागपूर महानगरपालिकेच्या एकूण १५१ जागांपैकी भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. प्रत्यक्ष निकालांमध्ये भाजपने १०९ जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा सत्तेवर आपली पकड मजबूत केल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला ३० जागांवर समाधान मानावे लागले असून, इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना एकूण १२ जागा मिळाल्या आहेत.
हा संपूर्ण राजकीय अंदाज निकाल जाहीर होण्याआधीच नागपूर टुडे न्यूजने मांडला होता. आता तो प्रत्यक्ष निकालांशी जुळत असल्याने माध्यमविश्वात या एक्सिट पोलची विश्वासार्हता अधिकच अधोरेखित झाली आहे. मतदारांचा कल अचूक ओळखत ‘नागपूर टुडे’ने शहरातील राजकीय वास्तवाचा योग्य अंदाज बांधल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालांमधून नागपूरकर मतदारांनी स्थिर नेतृत्व, विकासकामे आणि संघटनात्मक ताकदीला पसंती दिल्याचे स्पष्ट होते.
दरम्यान, या निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. निवडणूक कामकाजासाठी ३,५७९ कर्मचारी केंद्राध्यक्ष म्हणून, तर १०,७३७ कर्मचारी मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. शहरातील ३८ प्रभागांमधून निवडणूक रिंगणात उतरलेल्या तब्बल ९९३ उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला आज मतमोजणीद्वारे होणार आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या अंतिम निकालांसह, शहराच्या पुढील पाच वर्षांच्या राजकीय दिशा आणि विकासाचा मार्गही स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर, नागपूर टुडे न्यूजचा एक्सिट पोल हा या निवडणुकीतील सर्वात अचूक आणि चर्चेचा विषय ठरलेला अंदाज असल्याचे आता निर्विवादपणे समोर आले आहे.









