नागपूर : शहराच्या तापमानात वाढ होऊन पारा ४१.३ अंशांवर गेला. तर चंद्रपुरात विदर्भासह राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. एप्रिल महिन्याला सुरुवात झाल्यापासून तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुलडाणा वगळता विदर्भातील सर्वच जिल्ह्यांतील पारा चाळीशीपार झाला आहे.
नागपूरच्या कमाल तापमानात किंचित वाढ होऊन पारा ४१.३ अंशांवर स्थिरावला. तर विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपूर येथे करण्यात आली.
येथे नोंद झालेले ४२.६ अंश सेल्सिअस तापमान विदर्भासह संपूर्ण राज्यात सर्वाधिक ठरले. चंद्रपुरकरांना तप्त उन्हाचा सामना करावा लागत आहे.
गेल्या तीन-चार दिवसांपासून तापमान वाढले आहे. यवतमाळ (४२.२ अंश सेल्सिअस), वर्धा (४२.० अंश सेल्सिअस), अकोला (४२.० अंश सेल्सिअस), ब्रम्हपुरी (४२.० अंश सेल्सिअस), अमरावती (४१.४ अंश सेल्सिअस) याठिकाणीही उष्णतेचा कहर दिसला.