Published On : Fri, Apr 5th, 2019

नागपूरचे तापमान ४२ अंशावर : उष्माघाताचे ४७ रुग्ण

Representional Pic

नागपूर : शहराचे तापमान ४२ अंशावर गेले आहे. अंगाची लाहीलाही होत असताना उष्माघाताच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. गेल्या वर्षी नागपुरात ३६४ रुग्णांची नोंद झाली होती. यावर्षी जानेवरी ते आतापर्यंत ४७ रुग्ण आढळून आले आहेत. मेयो, मेडिकलमध्ये मात्र, अद्यापही शीतकक्ष (कोल्ड वॉर्ड) सुरूच झाले नाही.

बदलत्या नैसर्गिक वातावरणाचा दुष्परिणाम शरीरावर होतो. यात सर्वात जास्त तापदायक ठरतो तो उन्हाळा. या ऋतूमध्ये विशेषत: उष्माघाताचे रुग्ण सर्वात जास्त दिसून येतात. यामुळे मेयो, मेडिकलमध्ये दहा-दहा खाटांचे ‘कोल्ड वॉर्ड’ (शीतकक्ष) सुरू करण्यात येतात. उष्माघाताची लक्षणे असलेले रुग्ण दिसून येत असलेतरी या दोन्ही रुग्णालयाचे ‘कोल्ड वॉर्ड’ आपल्या नेहमीच्या तारखेस म्हणजे १५ एप्रिलपासून सुरू होणार आहेत. सध्या या वॉर्डातील कुलरच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे, हे दोन्ही रुग्णालय उष्माघाताचे रुग्णच दाखवत नाही. सूत्रानुसार, अशा रुग्णांच्या नोंदी ठेवणे आणि त्याची माहिती महापालिका, जिल्हा शल्यचिकित्सकापासून ते आरोग्य उपसंचालक आणि वैद्यकीय संचालकांना पाठवावी लागते. रुग्ण दगावल्यास शवविच्छेदन करावे लागते. ते टाळण्यासाठी मेयो, मेडिकल आणि खासगी इस्पितळांमध्ये उष्माघाताच्या रुग्णाला तापाचे रुग्ण म्हणून उपचार करतात.

मुले व वृद्धांना सर्वाधिक धोका
वैद्यकीय तज्ज्ञाानुसार, लहान मुले आणि वृद्धांना उष्माघाताचा धोका सर्वाधिक असतो. या शिवाय हायपरटेन्शन, मधुमेह, मूत्रपिंड, हृदय आणि यकृताच्या रुग्णांनाही हा आजार होऊ शकतो. शिवाय, मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करणाऱ्यांना व तापमानात जास्त कष्टाचे काम करणाऱ्यांनाही होऊ शकतो.

उष्माघाताची लक्षणे
१०४ डिग्री सेल्सिअसवर ताप जाणे, खूप डोके दुखणे, चिडचिडणे, रुग्णाला काही न समजणे, लघवीचा रंग गडद किंवा कमी असणे, श्वासोच्छवास जोरात चालणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. अशा स्थितीत मेंदू, किडनी, हृदय, मांसपेशी आणि दुसरे अवयव किंवा पूर्ण शरीराची प्रक्रिया प्रभावित होऊ शकते.

उष्माघात झाल्यावर हे करा
रुग्णाला थंड वातावरणात ठेवा. त्याचे कपडे सैल करा. थंड पाण्यात भिजवलेल्या कापडाने रुग्णाचे अंग पुसून त्याला थंड करा. रुग्णाला मीठ आणि साखरेचे भरपूर प्रमाण असलेले पेय द्या. तातडीने डॉक्टरांकडे घेऊन जा. लवकरात लवकर रुग्ण इस्पितळात पोहचल्यास त्याच्या वाचण्याची शक्यताही वाढते.