
नागपूर -शहरात भरधाव वाहनांमुळे अपघातांचे सत्र सुरूच असून, लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुनील हॉटेल चौकात टाटा एस वाहनाच्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. रस्ता ओलांडत असताना वाहनाने वृद्धाला जोरदार धडक दिली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मृत व्यक्तीची ओळख शंकर श्रावणजी नगरे अशी झाली आहे. शंकर नगरे हे जलाराम मंदिरात काम करायचे. काम आटोपून घरी परतत असताना सुनील हॉटेल चौकातील सिग्नलजवळ रस्ता ओलांडत असताना टाटा एस वाहन क्रमांक MH-49-BZ-5314 ने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे ते गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. जखमी नगरे यांना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पोलिसांसह फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले. पोलिसांनी टाटा एस चालक राजेंद्र अष्टंनकर याला अटक केली असून, लकडगंज पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.



