Published On : Thu, Aug 20th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूरमध्ये सोनोग्राफी केंद्रांवर कडक नजर; गर्भलिंग तपासणीची माहिती देणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस

Advertisement

नागपूरमध्ये सोनोग्राफी केंद्रांवर कडक नजर; गर्भलिंग तपासणीची माहिती देणाऱ्यास १ लाखांचे बक्षीस

नागपूर : शहर आणि जिल्ह्यात गर्भलिंग तपासणी करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर प्रशासनाने कडक नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा बेकायदेशीर प्रकाराची माहिती देणाऱ्या नागरिकांना ‘खबरी योजना’ अंतर्गत १ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नागपूर जिल्ह्यातील कोणत्याही सोनोग्राफी केंद्रात गर्भलिंग तपासणी होत असल्याची माहिती मिळाल्यास शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने देखरेख अधिक तीव्र केली आहे.

चार नवीन केंद्रांना मंजुरी-
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात जिल्हा सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत नागपूर जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांशी संबंधित विविध प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. चार नवीन केंद्रांना मंजुरी देण्यासह तीन केंद्रांच्या नोंदणीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच एका केंद्राचे कामकाज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

एका केंद्राकडून कायदे आणि नियमांचे पालन न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याची मान्यता पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आली.

Advertisement

डॉक्टरांच्या नोंदणीतील बदलांवरही लक्ष-
सोनोग्राफी केंद्रांमध्ये डॉक्टरांची नावे वारंवार समाविष्ट करणे किंवा वगळण्याच्या प्रकारावरही समितीने गंभीर चर्चा केली. नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अशा बदलांसाठी किमान सहा महिन्यांची कालमर्यादा निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई-
गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रज्ञान (लिंग निवड प्रतिबंध) कायदा, १९९४ चे उल्लंघन करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दोषींना शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन प्रक्रियेत प्रभावी बाजू मांडण्याचा निर्णयही समितीने घेतला.

नागपुरात यापूर्वीही बेकायदा गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.